मुंबई : कायद्याचे प्रात्यक्षिक ज्ञान, संकल्पना, बदलते स्वरूप याविषयीचे योग्य ज्ञान देण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे ‘क्लिनिकल लीगल एज्युकेशन अँड अॅडव्होकसी स्किल’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१६- १७ पासून ‘क्लिनिकल लीगल एज्युकेशन अँड अॅडव्होकसी स्किल’ अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. हा अभ्यासक्रम पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र स्वरूपात असून, हा अभ्यासक्रम ६ महिन्यांचा आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमाधून न्यायालयीन भेटी, सामाजिक उपक्रम, सामाजिक समस्यांवर सादरीकरण, न्याय व सामाजिक न्याय याविषयी चर्चा केली जाईल. या शिवाय अभ्यासक्रमात कायद्याव्यतिरिक्त समाजशास्त्र विषयाचा समावेश असेल. यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ज्येष्ठ विधीज्ञ आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभेल, तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे विद्यापीठ राष्ट्रीय विधी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अशोक शेंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठात ‘क्लिनिकल लीगल’
By admin | Published: June 21, 2016 2:42 AM