पनवेलमध्ये ‘क्लिनिक बंद’ आंदोलन
By Admin | Published: April 7, 2015 05:11 AM2015-04-07T05:11:39+5:302015-04-07T05:11:39+5:30
लाइफ लाइन हॉस्पिटलमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी पनवेल तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी क्लिनिक बंद आंदोलन केले
पनवेल : लाइफ लाइन हॉस्पिटलमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी पनवेल तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी क्लिनिक बंद आंदोलन केले. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. या प्रकरणी मृत रुग्णाच्या चार नातेवाइकांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिली.
रोडपाली येथील रहिवासी नामुबाई ठाकूर या महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टर संदीप आमले व डॉ.अमित चव्हाण या दोघांना बेदम मारहाण केली.
त्यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दखल घेत रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेनंतर लागेच पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले व संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रामकृष्ण ठाकूर, अंकुश कृष्णा ठाकूर, संतोष कृष्णा ठाकूर, सागर विनायक पाटील यांना अटक केली. सोमवारी या चारही जणांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींना ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनने क्लिनिक बंद आंदोलन पुकारले.