राज्यातील सर्व टपाल कार्यालये तत्काळ प्रभावाने बंद करा, संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा प्रभाव व प्रसार राज्यात वाढत चालला असताना टपाल कार्यालये सुरु ठेवण्याचा अट्टाहास सोडून द्यावा व राज्यातील सर्व कार्यालये तत्काळ प्रभावाने बंद करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. टपाल खात्याचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अगरवाल यांच्याकडे ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियनने ही मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे सर्कल सचिव राजेश सारंग या मागणीबाबत म्हणाले, टपाल खात्याचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला असला तरी टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येत असतो. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असल्यास टपाल खात्याच्या पोस्टमन व इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्याचा संसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात इतरांना होण्याची भीती आहे. पूर्णत: लॉकडाऊन केले नाही तर याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामध्ये टपाल खात्याचे कर्मचारी माध्यम होऊ इच्छित नाहीत. संविधानाच्या कलम 21 अन्वये प्रत्येक नागरिकाला जीवाची हमीचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र टपाल खाते जर अत्यावश्यक सेवेचा मुद्दा समोर आणून त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असेल तर असा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, असा इशारा सारंग यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जान है तो जहाँन है या घोषणेप्रमाणे टपाल कर्मचाऱ्यांना या संभाव्य धोक्यापासून वाचवणे गरजेचे आहे, याकडे सारंग यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर संघटना पुढील उपाययोजनेबाबत विचार करेल असा इशारा देण्यात आला आहे.
टपाल खात्याच्या सचिवांनी बुधवारी काढलेल्या परिपत्रकामध्ये, टपाल खात्याचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असल्याने टपाल कार्यालये सुरु ठेवावीत, अत्यावश्यक सेवेसाठीचे पास कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी घ्यावेत. राज्य सरकार अत्यावश्यक वस्तू जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी टपाल खात्याला या वस्तू आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून पोचवण्याची व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकते याकडेे सचिवांनी लक्ष वेधले आहे.