मुंबईतील पाच हजार ठिकाणांवर बारीक लक्ष; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 06:32 AM2024-07-09T06:32:24+5:302024-07-09T06:32:35+5:30
सोमवारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबई : मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की, अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. रविवारी रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर इतका पाऊस पडला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी पाऊस पडल्याने रेल्वेमार्ग आणि चुनाभट्टी, सायन या भागात पाणी साचले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच मुंबईतील सुमारे पाच हजार ठिकाणांवर पालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. सोमवारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
देशात मायक्रो टनेलिंगसारखा प्रयोग पहिल्यांदा
मोठा पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. पालिकेने जलसाठवण टाक्या तयार केल्यामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नाही, देशात मायक्रो टनेलिंगसारखा प्रयोग पहिल्यांदा केल्यामुळे पाणी निचरा होण्यास मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत आहे. साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा उभारण्यात येत आहे. सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.