मुंबई - आयपीएल सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमला जाणा-या क्रिकेटप्रेमींना आता श्री पाटण जैन मंडळ राेडवरील पादचारी पुलाचा वापर करता येणार नाही. हा पूल धाेकादायक असल्याने आजपासून रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट शाैकिनबराेबरचं स्थानिक शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी व पालकांचीही माेठी गैरसाेय हाेणार आहे. हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने सर्व अतिधाेकादायक पूल बंद केले आहेत. अशा 14 धाेकादायक पुलांपैकी काही पूल पाडण्यात आले आहे. हिंद विद्यालय आणि एम.के.मार्गाच्या जंक्शन नजिक असलेला श्री पटन जैन मंडळ मार्गाला जाेडणारा पादचारी पुलही धाेकादायक जाहीर करण्यात आला आहे. हा पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार आहे.
या पुलावरून वानखेडे स्टेडियमच्या गेट क्र. चार येथे उतरता येत हाेते. यामुळे स्टेडियमवर येणारे क्रिकेटप्रेमी या पादचारी पुलाचा हमखास वापर करीत. तसेच या परिसरात काही शाळाही असल्याने पालक व विद्यार्थीदेखील या पुलाचा वापर करीत असतं. मात्र आजपासून हा पूल रहदारीसाठी बंद झाल्यामुळे या सर्वांना आता ए.के.मार्गावरील कला निकेतन येथील पादचारी पूल किंवा मरीन लाईन्स रेल्वे स्थानक येथील पुलाचा वापर करावा लागणार आहे.शहर भागातील 39 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटर डी.डी.देसाई यांनी ऑडिट केले हाेते. त्याने वानखेडे येथील पादचारी पूल धाेकादायक जाहीर केला हाेते. हा पूल पाडून त्याची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदाही तयार आहेत. मात्र लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव रखडण्याची चिन्हे आहेत. 29 एप्रिल राेजी मतदानानंतर या पुलाच्या कामाचे कार्यादेश निघू शकेल.