मुंबई : ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि शहरात नुकत्याच सुरू झालेल्या शाळा या पुन्हा बंद होणार का? हा विषय पालकांच्या चिंतेत भर टाकत आहे. मात्र शाळाच सुरूच होणार नाहीत, अशा पद्धतीने मार्गदर्शक सूचना केल्या गेल्या आहेत. अनेक मोठ्या खासगी शाळा नियमांवर बोट ठेवून शाळा सुरू करण्यात अडथळे निर्माण करत आहेत, अशा गंभीर तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
ओमायक्रॉनचा संसर्ग आणि रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याने भीती वाढत असली तरी तूर्त शाळा बंद करण्याचा विचार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर शहरच ठप्प झाले, अत्यावश्यक सेवा सुविधा वगळता सगळे व्यवहारच बंद करावे लागले तरच शाळा बंदचा निर्णय घ्या, अशी मागणी आता पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई या संघटनेने केली आहे. तर शिक्षण ही प्राथमिकता आहे. याचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा, अशी मागणी या पालकांनी केली आहे.
मार्गदर्शक सूचना कोणी वाचल्या आहेत का?शाळा सुरू केल्यानंतर शिक्षण विभागाने ज्या मार्गदर्शक सूचना शाळांना दिल्या आहेत, त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज असोसिएशनने मांडली. शाळा सद्यस्थितीत पूर्ण वेळ सुरू नसल्याने, वार्षिक परीक्षा तोंडावर येऊनही मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याच्या तक्रारी आहेत. मुलांना गणित, विज्ञान, भाषा याशिवाय इतर विषयांचे महत्त्व आणि ज्ञान मिळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धती कमी पडत आहे, असे मत पालकांनी मांडले. त्यामुळे शाळा पूर्ण वेळ, पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. शाळांतील उपक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. त्यातच यामुळे अडथळे येत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी मांडल्या आहेत.
मॉल, सिनेमा, बाजारात मुले गेलेली चालतात, मग ती शाळेत गेली तर धोका कसा होतो..? असा सवाल करत शाळा सुरू करण्यासाठी मुंबईत पालक एकवटले असून, त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन याचिका स्वाक्षरी मोहिमेत ६ हजार पालकांचा सहभाग असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर आणखी पालक पुढे येत आहेत.
शासन शाळांच्या बाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. दरम्यान, विद्यार्थ्यांची सुरक्षितता शाळांइतकी पालकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे शाळा असोत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणे मास्क घालणे, गर्दी टाळणे आणि स्वच्छता राखणे या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले तर ही परिस्थिती बदलू शकते. - डॉ. समीर दलवाई, बालरोगतज्ज्ञ
‘लोकल सर्कल’चा सर्व्हे काय म्हणतो? लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणानुसार ४९ टक्के पालक, जिल्ह्यात ओमायक्रॉनचे एकाहून अधिक रुग्ण असतील तर शाळा बंद कराव्यात, असे मत व्यक्त करतात. तर २१ टक्के पालकांमध्ये ओमायक्रॉनची भीती असून जिल्ह्यात एक जरी रुग्ण असल्यास प्रशासनाने शाळा बंदचा निर्णय घ्यावा, असे मत नोंदविले. सद्यस्थितीत शाळा सुरू करू नयेत, असे मत १८ टक्के पालकांनी मांडले.