कारखाने स्वत: बंद करा, अन्यथा आम्ही पाडू! प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 07:51 AM2023-04-10T07:51:53+5:302023-04-10T07:52:16+5:30
मुंबईत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रदूषण वाढले असून हवेचा दर्जा खालावला आहे.
मुंबई :
मुंबईत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रदूषण वाढले असून हवेचा दर्जा खालावला आहे. वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी धूळमुक्त मुंबईचा आराखडा तयार करून, सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेने प्रदूषणाच्या मुद्द्यावर विभागस्तरावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भंगार अल्युमिनियम जाळणाऱ्या आणि धुरास कारणीभूत ठरणाऱ्या २० ते २२ कारखान्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच ४८ तासांमध्ये मालकांनी कारखाने स्वतःहून बंद न केल्यास ते बंद पाडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे.
मुंबईतील प्रदूषणासाठी धूळ हा घटक प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीने सात दिवसांत अहवाल सादर करून १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नोटीस कोणाला ?
कुर्ला परिसरातील बेकायदा कारखान्यांवर नोटीस बजावण्यात आली. खैरानी रोड, साकिनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगारची बेकायदा दुकाने आणि कारखाने, गोदामे आहेत.
यापैकी काही दुकानांमध्ये भंगारातील धातूच्या वस्तू जाळून, वितळवून त्याचे छोटे चौकोनी तुकडे तयार करण्यात येतात.
या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्युमिनियम जाळले जाते. काही ठिकाणी कचराही जाळण्यात येतो.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत प्रदूषण करणारे कारखाने सुरू असून महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला कायम विरोध होतो.
कारखान्यांत धातू जाळण्याचा व्यवसाय सुरू असून त्यात वाढ होत आहे. त्यामुळे ही नोटीस देण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त महादेव शिंदे यांनी दिली.