पंढरीनाथ कुंभारे ल्ल भिवंडीगेल्या दोन-तीन महिन्यांंपासून कापड बाजारात तेजी-मंदीचे वारे वाहत असून, कापड विक्रीस उठाव नसल्याने मुंबईतील कापड विक्रेत्यांना अपेक्षित भाव मिळालेला नाही. त्यामुळे कापडाची कृत्रिम टंचाई निर्माण व्हावी, यासाठी यंत्रमागधारक व चालकांना वेठीस धरून २ फेब्रुवारी रोजी ‘यंत्रमाग बंद’ची हाक यंत्रमागधारकांच्या संघटनेने दिली आहे़ परंतु, या उद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या कामगारांचे काय? याबाबत यंत्रमाग मालकवर्गाने कारखाने बंद ठेवताना कोणताही खुलासा केलेला नाही़ त्यामुळे बंदच्या दिवशी कामगारांस उपाशी राहावे लागणार असल्याचा आरोप स्थानिक कामगार नेत्यानी केला आहे़देशातील अस्थिर व्यापार व परदेशांत डॉलरचा भाव वाढल्याने महाराष्ट्रातील कापडास अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे मुंबईच्या व्यापाऱ्यांकडे कापड साठले आहे. आर्थिक चलन थंडावल्याने नवीन कापड बनविण्याचे धाडस कापड व्यापाऱ्यांकडून होत नाही. परिणामी, यंत्रमागधारकांना कमी मजुरीत कापड विणणे भाग पडत आहे. जर सर्वांनी यंत्रमाग बंद ठेवले तर मुंबईतील व्यापाऱ्यांकडे कापडाचा तुटवडा निर्माण होईल आणि कापड विकले जाईल. परिणामी, विणकरांना चांगला भाव मिळेल, ही यंत्रमाग बंद व आंदोलनामागची कारखानदारांची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील वीजदरात वाढ झाली असून शासनाची बंद झालेली सबसिडीची सवलत पुन्हा सुरू झाली तर त्याचा फायदा यंत्रमाग कारखानदारांस मिळणार आहे. त्यामुळे वीजदरवाढीची ढाल पुढे करून यंत्रमाग संघटनांनी ‘कारखाने बंद’ची घोषणा केली आहे. कापड व्यापारी व यंत्रमागधारकांनी आपल्या स्वार्थासाठी हा बंद पुकारला असून, या दिवशी यंत्रमाग कामगारांना भरपगारी रजा मिळणार नाही. त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होऊन कामगार व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होणार आहे. यासाठी कामगार अधिकाऱ्यांनी यंत्रमागधारक व चालकांना जाब विचारणे, ही काळाची गरज आहे. यापूर्वी व्यापारी व कारखानदारांच्या लहरीपणामुळे कामगारांना उपाशी राहावे लागले होते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कृत्रिम कापड टंचाईसाठी बंद
By admin | Published: February 01, 2015 1:56 AM