Join us  

बंद असलेल्या बाभई स्मशानभूमीचं काम पूर्ण होणार, पालिकेचं पत्र, डॉ.मीरा कामत यांनी उपोषण सोडलं

By मनोहर कुंभेजकर | Published: July 24, 2024 7:47 PM

Mumbai News: बोरिवली पश्चिम बाभई येथील स्मशानभूमी गेल्या ऑक्टोबर पासून बंदच आहे. बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील ८० वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मीरा कामत यांनी काल सकाळ पासून पालिकेच्या आर मध्य कार्यालयावर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - बोरिवली पश्चिम बाभई येथील स्मशानभूमी गेल्या ऑक्टोबर पासून बंदच आहे. बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील ८० वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मीरा कामत यांनी काल सकाळ पासून पालिकेच्या आर मध्य कार्यालयावर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. आज अखेर पालिकेच्या आर मध्य विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉ.मीरा कामत यांना पत्र दिले. दि,१० जुलैला काम सुरू झाले असून येत्या दि,२४ ऑगस्ट पर्यंत सदर स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्यात येईल असे पत्र आपल्याला दिल्यावर  आज दुपारी ४ वाजता नारळ पाणी घेत उपोषण मागे घेतले असे कामत यांनी लोकमतला सांगितले.

त्यांच्या आंदोनालनात अँड. कपिल सोनी, सारिका सावंत, विनोद पंदेरे, गणेश कोरुडे, यदुनाथ प्रजापती, भावी ठकार, नितीन डिसिल्वा,विजयालक्ष्मी शेट्टी,अरुणा जोशी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.तर काल रात्रभर काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान या संदर्भात कालच्या लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमत मध्ये बोरिवली येथील बाभई स्मशानभूमी तातडीने सुरू करा या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.लोकमतचे वृत्त वाऱ्या सारखे व्हायरल झाले. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत उद्धव सेनेचे माजी आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख उदेश पाटेकर,  महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, उपविभागप्रमुख विनायक सामंत, प्रविण प्रधान, प्राची साईराम, शाखाप्रमुख विपुल दारुवाले, सागर सरफरे, एडविन बंगेरा, प्रेरणा राणे यांनी उपोषणकर्त्या मीरा कामत आणि आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांची आज दुपारी भेट घेतली.पालिका प्रशासनाने सदर प्रकरणी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती.

आपण याबाबत विधानपरिषदेत याप्रकरणी आवाज उठवला होता.बिल्डरच्या फायद्यासाठी पालिका प्रशासनाने येथील जुन्या स्मशानभूमीला टाळे ठोकले होते. येथील स्मशानभूमीची डागडुजी करून ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली होती अशी माहिती पोतनीस यांनी दिली.

 कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लोकमतची बातमी ट्विट करत बोरीवली पश्चिम येथील बाभई स्मशानभूमीचा किमान एक लोखंडी रॅक सुरू करा या मागणीसाठी ८० वर्षाच्या मीरा कामत या सामाजिक कार्यकर्त्या उपोषणाला बसल्या आहेत.  आता पालिकेतर्फे अक्षम्य दिरंगाई होत आहे.त्यांच्या प्रकृतीला त्रास झाला तर सर्वस्वी पालिका जबाबदार राहील. मुंबई महापालिका आयुक्तांनी स्वतः तातडीने लक्ष घालावे. अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेच्या लढ्यात सहभागी होईल.असा इशारा त्यांनी दिला होता.

काय आहे पालिकेची भूमिकादरम्यान आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले की,त्यांनी खरे तर उपोषण करण्याची गरजच नव्हती. सदर काम म्हाडाने दि,10 जुलैला सुरू केले  असून येत्या एक महिन्यात सदर काम पूर्ण होणार आहे.त्या सतत भूमिका बदलत होत्या,कधी हे पत्र द्या,तर दुसरे असे पत्र द्या अशी मागणी करत त्या आरटीआय कार्येकर्त्या प्रमाणे वागत होत्या.त्यांना हवी असलेली माहिती अधिकारात  आम्ही दिली. येथे काम सुरू असतांना एक चिता सुरू करा ही त्यांची मागणी मान्य करण्यासारखी नव्हती.यामुळे येथे येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांच्या जीवाला धोका झाला असता.आम्ही त्यांना काही उपोषण मागे घ्यायला सांगितले नाही.त्यांना अखेर वस्तूस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.मात्र पालिका प्रशासनाला वेठीस धरून त्यांनी खूप मनस्ताप दिल्याचे नांदेडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई