मुख्यमंत्री-महाजन यांच्यात पाऊण तास बंद दाराआड चर्चा; दालनाबाहेर आमदारांसह मंत्रीही ताटकळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 05:39 AM2023-08-19T05:39:55+5:302023-08-19T05:40:26+5:30
मंत्रालयात सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यात तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंत्रालयात सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यात तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी दालनाबाहेर शिंदे गटाच्या आमदारांसह काही मंत्री आणि इतर पक्षांचे आमदारही ताटकळत उभे होते.
मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री शिंदे दालनाच्या ॲन्टी चेंबरमध्ये गेले. यानंतर त्यांनी गिरीश महाजन यांना चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले. १० ते १५ मिनिटांनंतर मंत्री शंभूराजे देसाईही घाईघाईत ॲन्टी चेंबरमध्ये गेले. त्यानंतर १५ मिनिटांनी देसाई केबिनमधून बाहेर आले. मात्र, शिंदे आणि महाजन यांच्यात चर्चा सुरूच होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांसह सर्वांना बाहेर ठेवण्यात आले होते. यात डझनभर आमदारही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ॲन्टी चेंबरच्या बाहेर उभे होते. बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री कार्यालयात गेले. त्यामुळे तिथे थांबलेल्या आमदारांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सर्व आमदारांकडून निवेदन घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठवली.
आमदार शिरसाट यांचा मंत्री भुमरे यांना टोला
ॲन्टी चेंबरबाहेर मंत्री संदीपान भुमरेही मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटही तेथे आले. भुमरे मुख्यमंत्र्यांची वाट पाहत असल्याचे पाहून त्यांनी भुमरेंना टोला लगावला. मंत्रिमंडळाची बैठक आता संपली आहे. त्यामुळे इथे बसण्यापेक्षा मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयात जावे, असे ते भुमरेंना म्हणाले.