Join us

राज्यातील बंद उद्योगांना मिळणार ‘अभय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

- उद्योगमंत्री सुभाष देसाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली ...

- उद्योगमंत्री सुभाष देसाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सूक्ष्म, लघू, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

प्रस्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी मंगळवारी देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली. या वेळी विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, अंबरनाथ, तळोजा, अंबड, सिन्नर आदी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी व औद्योगिक संघटनांनी भाग घेऊन काही सूचना केल्या. यामध्ये सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक नामकर्ण आवारे, पिंपरी चिंचवड औद्योगिक संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, विदर्भ औद्योगिक संघटनेचे सुरेश राठी, लघू, मध्यम उद्योग संघटनेचे प्रदीप पेशकार यांचा समावेश होता.

विविध उद्योजक संघटनांनी केलेल्या या सर्व सूचनांची दखल घेऊन नवी योजना तयार करण्यात यावी, असे निर्देश देसाई यांनी दिले. यापूर्वी २०१६ मधील अशा अभय योजनेचा २८७ उद्योगांनी लाभ घेतला आहे. प्रस्तावित विशेष अभय योजना उद्योगस्नेही असेल. रोजगार गमावलेल्या कामगारांना या योजनेद्वारे रोजगार उपलब्ध होईल, देशातील इतर राज्येही या योजनेचे अनुकरण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीला उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, सह सचिव संजय देगांवकर आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

.............................