बंद पडलेले मेट्रो दोन ब चे काम येणार रुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 08:51 PM2020-10-21T20:51:10+5:302020-10-21T20:51:31+5:30
Mumbai Metro : दहा महिन्यानंतर पुन्हा कामाला चालना; वादग्रस्त निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यावर
मुंबई : अत्यंत संथ गतीने काम करणा-या डी. एन. नगर ते मानखूर्द (मेट्रो दोन ब) या मार्गिकेवरील कंत्राटदारांना एमएमआरडीएने फेब्रुवारी महिन्यांत बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून बंद पडलेले या मेट्रो मार्गिकेचे काम मार्गी लावण्यासाठी नव्या कंत्राटदारांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे. कारशेडच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती नुकतीच झाली असून उर्वरित दोन पँकेजचे कंत्राटदार येत्या महिन्याभरात अंतिम होतील. त्यामुळे डिसेंबरपूर्वी हे काम पुन्हा ट्रँकवर येईल अशी माहिती एमएमआरडीएतल्या सुत्रांनी दिली.
मेट्रो दोन ब ही मार्गिका आँक्टोबर, २०२२ पासून कार्यान्वीत करण्याचे मुळ नियोजन होते. मात्र, सिंपलेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, आरसीसी इन्फा व्हेन्चर्स आणि एमबीझेड या कंपन्याचे कंत्राट रद्द केल्यानंतर त्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ९३ टक्के शिल्लक काम पूर्म करण्यासाठी ९ महिने प्रयत्न सुरू आहेत. दोन वेळा काढलेल्या निविदांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या कामांमध्ये वाकोला नाला, कलानगर आणि मिठी नदी या तीन ठिकणीच्या आयकाँनीक ‘केबल ब्रिज’च्या उभारणीचा समावेश करणे गरजेचे असल्याचा साक्षात्कार एमएमआरडीएला झाला. त्यामुळे तीन पैकी दोन कामांच्या निविदा आँगस्ट महिन्यांत रद्द करून नव्याने प्रक्रिया सुरू झाली.
डी एन नगर ते एमटीएनएलपर्यंतच्या पँकेज सी -१०१ (१०५८.७१ कोटी), एमटीएनएल ते डायमंड गार्डन, चेंबुरपर्यंतच्या पँकेज सी -१०२ (४७४ कोटी) आणि मानखुर्द डेपो पँकेज सी- १०३ (४६४ कोटी) अशी ही तीन पँकेजमधली कामे आहेत. त्यापैकी डेपोच्या कामासाठी आहलूवालिया या कंपनीची नुकतीच नियुक्ती झाली आहे. उर्वरित दोन टप्प्यांसाठी अँफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट, लार्सन अँण्ड टूब्रो तसेच एनसीसी लि. या कंपन्या तांत्रिक आघाड्यांवर पात्र ठरल्या आहेत. त्यांचे आर्थिक देकार उघडून लघूत्तम निविदाकाराची निवड लवकरच अपेक्षित आहे.
खर्चात होणार वाढ ; लोकार्पणही लांबणीवर
डेपोच्या कामासाठी ४६४ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असताना त्या कामासाठी लघुत्तम निविदाकाराला ५४३ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. तर, अन्य दोन पँकेजच्या खर्चाचे अंदाजपत्रक १५३२ कोटी रुपयांचे असले तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या खर्चात किती वाढ झाली हे स्पष्ट होईल. त्याशिवाय हे काम पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे किमान जून, २०२३ अखेरीपर्यंत या मार्गिवरील मेट्रोची धाव शक्य नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.