मुंबई : मुंबईतील महत्त्वाचा सायन उड्डाणपूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
वाशी, नवी मुंबई आणि पुढे पुण्याला जाण्यासाठी सायन उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २००३ सालापासून वाहतुकीसाठी सुरू झालेल्या या उड्डाणपुलाचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार, उड्डाणपुलाचे बेअरिंग तातडीने बदलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ही गरज लक्षात घेत, एमएसआरडीसीने वाहतूक विभागाशी चर्चा करून मेपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उड्डाणपूल दुरुस्ती कामासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. दुरुस्तीसाठीच्या मशिन आणि इतर साहित्य त्या ठिकाणी आणण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात बेअरिंग बदलण्यास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. हा उड्डाणपूल बंद झाल्यास वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र, ही दुरुस्ती उड्डाणपुलाच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे.
वेळेत बदलउड्डाणपूल २० एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. मात्र, आता तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुरुस्तीच्या कामानिमित्त वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.