Join us

पालिकेतील दस्तावेजांसाठी बंदिस्त व्हेरियेबल सेगमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:04 AM

मुंबई- महापालिकेतील अनियमितता, गैरवर्तणूक व गैरव्यवहार प्रकरणातील दस्तावेज व दैनंदिन कागदपत्रे, जुन्या लोखंडी रॅकमध्ये खराब होत आहेत. त्यामुळे हे ...

मुंबई- महापालिकेतील अनियमितता, गैरवर्तणूक व गैरव्यवहार प्रकरणातील दस्तावेज व दैनंदिन कागदपत्रे, जुन्या लोखंडी रॅकमध्ये खराब होत आहेत. त्यामुळे हे दस्तावेज बंदिस्त व्हेरियेबल सेगमेंटमध्ये जतन करण्यासाठी चौकशी विभागातर्फे निविदा मागविण्यात आली आहे. मात्र, या माध्यमातून घोटाळ्याचे पुरावे नष्ट करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मुंबई महापालिकेत लाखोंच्या संख्येने कागदपत्रे व दस्तावेज आहेत. यापैकी काही कागदपत्रे अनेक वर्षे जुनी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेत झालेल्या अनियमितता, गैरवर्तणूक, गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशी पूर्ण झाल्यानंतर तयार केलेल्या फाइल्सचाही समावेश आहे. हे सर्व दस्तावेज जतन करण्यासाठी उघड्या लोखंडी रॅक व कपाटे यामध्ये ठेवण्यात आले आहेत. परंतु, उघड्या रॅकमध्ये असल्यामुळे या फाइल्स खराब होऊ लागल्या आहेत.

तसेच जागाही कमी पडत असल्याने बंदिस्त वेअरेबल स्टेटमेंट उपलब्ध केल्यास या फाइल्स सुरक्षित राहतील, असा पालिकेचा विश्वास आहे. त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी दोन कोटी ५३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. आता सत्ताधारी शिवसेनेने हे दस्तावेज गायब करण्यासाठीच हा घाट घातला असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.