Join us

लाचखोर अधिका-यांचा चोरमार्ग बंद

By admin | Published: November 04, 2014 1:21 AM

इमारत प्रस्ताव विभागातील तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने या खात्यातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे़

मुंबई : इमारत प्रस्ताव विभागातील तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने या खात्यातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे़ त्यामुळे येथील लाचखोरांना चाप लावण्यासाठी महापालिका प्रशासन कठोर पावलं उचलणार आहे़ त्यानुसार इमारतीच्या आराखड्याबरोबरच सर्व आवश्यक कागदपत्रे एकाचवेळी आॅनलाइन जमा करण्याची सक्ती विकासकांना केली जाणार आहे़ परिणामी लाचखोर अधिकाऱ्यांबरोबरच विकासकांचाही चोरमार्ग बंद होणार आहे़इमारत बांधण्याची परवानगी मिळवण्यासाठी सर्वप्रथम विकासकाला प्रस्तावित इमारतीचा आराखडा पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे सादर करावा लागतो़ त्यानंतर अग्निशमन दल, वृक्ष प्राधिकरण, विमानतळ प्राधिकरण अशा विविध खात्यांतून ही फाइल पुढे सरकते़ मात्र ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विकासकांकडून मोठी रक्कम मागितली जात आहे़ याचा फायदा उठवत काही विकासक आपले उखळ पांढरे करून घेतात़ आतापर्यंत राजरोस सुरू असलेला हा कारभार भायखळा कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे उघड झाला़ फाइल पुढे सरकविण्यासाठी १५ लाख रुपये घेणारे तीन अभियंते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले़ पालिकेची लाज घालविणाऱ्या या घटनेनंतर या भ्रष्टाचाराचे मूळ उखडून काढण्याचा निर्धार प्रशासनाने केल्याचे समजते़ मात्र अद्याप याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याने अधिकारी याविषयी उघड बोलण्यास तयार नाहीत़