Join us

बंद योजना सुरू होणार

By admin | Published: October 29, 2015 1:01 AM

वीजबिलाच्या थकबाकीपोटी बंद पडलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.

मुंबई : वीजबिलाच्या थकबाकीपोटी बंद पडलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. पहिल्या भागात दुष्ष्काळी भागातील योजना सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मूळ थकबाकीची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा दहा समान मासिक हप्त्यात भरावी लागणार आहे. महावितरण कंपनीतर्फे उर्वरित ५० टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी ग्राहकांनी जुलै १५ च्या पुढील बिले निश्चित कालावधीत भरणे आवश्यक आहे, तसेच ८० टक्के पाणीपट्टी वसूली होणे आणि पाणी चोरीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक असेल. कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर पेयजल संजीवनी योजना राबविली जाणार आहे. महावितरणतर्फे राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय, निमशासकीय पाणीपुरवठा योजनांना वीजपुरवठा करण्यात येतो. चालू वीजबिलाचा भरणा केला नसल्याने, त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीत वाढ होत आहे. राज्यात पडलेला अल्प पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि येत्या उन्हाळ्यात संभवणाऱ्या पाणीटंचाईमुळे हा प्रश्न गंभीर होणार आहे. याबाबत उपाययोजना म्हणून पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात योजनांचा समावेश करण्यासाठी वित्त, ऊर्जा आणि पाणीपुरवठा मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या थकीत बिलाची कारणे निश्चित करण्यासाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती थकीत वीजबिलांची कारणे सुनिश्चित करण्यासोबतच मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष ठरवेल. समिती तीन महिन्यांत अहवाल देईल. त्यामुळे येत्या काळात आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतील, अशा योजनाच हाती घेण्यात येणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)