महाडमधील आंबेडकर स्मारकातील नाट्यगृह बंद
By Admin | Published: February 9, 2015 10:40 PM2015-02-09T22:40:55+5:302015-02-09T22:40:55+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला.
महाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती कायमस्वरूपी राहाव्यात यासाठी महाड शहरात सुमारे २० कोटी रुपये खर्चून बांधलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.
स्मारकात असलेले अद्ययावत वातानुकूलित नाट्यगृह गेल्या अनेक महिन्यांपासून डागडुजीच्या नावाखाली बंद असल्यामुळे नाट्यरसिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या या स्मारकाची देखभाल ही पुण्यातील डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे आहे. मात्र या स्मारकाच्या देखभालीकडे संस्थेचे दुर्लक्ष होत आहे. या स्मारकात सुसज्ज ग्रंथालय व स्वतंत्र अभ्यासिका असून या ग्रंथालयाचे ग्रंथपाल सध्या या स्मारकाचे व्यवस्थापन पाहतात. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ देखभाली व डागडुजीच्या नावाखाली नाट्यगृह बंद असल्याने नाट्यप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)