Join us

मुंबईतील १३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By admin | Published: July 27, 2015 1:48 AM

देशाची आर्थिक राजधानी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात असली तरी महानगरातील

जमीर काझी , मुंबई देशाची आर्थिक राजधानी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात असली तरी महानगरातील ठिकठिकाणचे तब्बल १२९५ क्लोज सर्किट अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त म्हणजे बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सरकारी मालकीच्या ३३३ तर सार्वजनिक उपक्रमातील १६४ कॅमेऱ्यांचा समावेश आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील २५५ तर ठाणे व नवी मुंबईतील अनुक्रमे ६७ व २० कॅमेरे ‘आंधळे’ आहेत. गृह विभागाने तयार केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यातून घातपात व गैरकृत्याला प्रतिबंधासाठी अत्यावश्यक असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असली तरी त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहेत. कॅमेऱ्याबाबतचे अपुरे ज्ञान व दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, हा प्रकार म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ या उक्तीप्रमाणे झाली आहे. राज्य सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या आढाव्यामध्ये ही बाब समोर आली. ३० जूनपर्यंतची ही आकडेवारी असून, त्यानुसार महाराष्ट्रात सध्या १ लाख ११ हजार १९५ कॅमेरे कार्यान्वित आहेत. २,८५७ बंद असल्याचे नमूद करण्यात आले. मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प कागदावरच असला तरी उपरोक्त अस्तित्वात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे व त्याच्या सध्याच्या स्थितीबाबतचा अहवाल गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. त्यानुसार मुंबईत खासगी क्षेत्रात सर्वाधिक ३४ हजार ३५९ कॅमेरे सुरू तर ७९८ बंद अवस्थेत आहेत. सरकारी व सार्वजनिक उपक्रमांतर्गत बसविण्यात आलेल्यांपैकी अनुक्रमे ३२०७ व ५२०३ कॅमेरे सुरू आहेत. तर अनुक्रमे ३३३ व १६४ कॅमेरे दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत आहेत.