राज्यातील मॉल बंद असल्याचा दोन लाख कर्मचाऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:06 AM2021-07-29T04:06:51+5:302021-07-29T04:06:51+5:30
मुंबई : महाराष्ट्रात मॉल अजूनही बंदच आहेत. यामुळे व्यावसायिकांसोबतच तिथे काम करणाऱ्या राज्यातील २ लाख कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला ...
मुंबई : महाराष्ट्रात मॉल अजूनही बंदच आहेत. यामुळे व्यावसायिकांसोबतच तिथे काम करणाऱ्या राज्यातील २ लाख कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. राज्यातील मॉल आणि शॉपिंग सेंटर्सना आवश्यक त्या सुरक्षेसंबंधीची खबरदारी घेऊन कामे करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आरएआय) पुन्हा एकदा राज्य सरकारकडे केली आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय)चे सीईओ कुमार राजागोपालन म्हणाले, प्रदीर्घ काळ बंद राहिल्याचा फटका महाराष्ट्रातील अंदाजे ५० मॉलला बसला आहे. ज्यात २ लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. मॉलचे महिन्याला सुमारे ४०,००० कोटी रुपयांचे उत्पन्न असून ४,००० कोटींचा जीएसटी दिला जातो. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्स महत्त्वपूर्ण आर्थिक केंद्रे असल्याने महाराष्ट्र सरकारने ती लवकर सुरू करण्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे कुमार म्हणाले.
दिल्ली आणि हरियाणा सरकारने अन्य बाजारांसह मॉल पुन्हा सुरू करून एक उदाहरण समोर ठेवले आहे. महाराष्ट्र शासनालाही हीच विनंती आहे. यामुळे केवळ नोकऱ्या व व्यवसाय वाचविण्यास मदत होणार नाही तर नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरणात खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल. मॉल्समध्ये बाजारपेठेपेक्षा अधिक कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे गर्दी हाताळण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच स्टॅन्ड अलोन शॉप्स आणि मार्केट्ससह मॉल्स आणि शॉपिंगसेंटर्सदेखील सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी भूमिका कुमार राजागोपालन यांनी मांडली आहे.