गोखले ब्रिज बंद केल्याने वाहतूक व्यवस्थापनाचे वाजले तीन तेरा
By मनोहर कुंभेजकर | Published: November 7, 2022 05:51 PM2022-11-07T17:51:46+5:302022-11-07T17:53:58+5:30
अंधेरी पूर्व,पश्चिमेला वाहतूक व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहेत.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने आज पासून पूर्णपणे वाहतूक पोलिसांनी बंद केला आहे. परिणामी अंधेरी पूर्व,पश्चिमेला वाहतूक व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहेत.
अंधेरी पश्चिमेकडील एस.व्ही.रोड,लिंक रोड ,जे.पी.रोड,इर्ला जंक्शन,पार्ले जंक्शन,शॉपर्स स्टॉप येथे तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे याठिकाणी वाहतूक पोलिस नव्हते. तर गोखले पूल बंद झाल्यानें होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियंत्रण करण्यासाठी नवीन सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांनी कार्यान्वित केली नव्हती.यासंदर्भात कोणतीही माहिती व कार्यवाही वाहतूक पोलिसांकडून होत नसल्याने आमची स्थिती तर गोंधळलेली होती, काय करावे हे सूचत नव्हते अशी माहिती अंधेरीकरांनी लोकमतला दिली.
विलेपार्ले येथील पार्ले बिस्कीट फॅक्टरीजवळ अंधेरी सबवे तसेच रेल्वेच्या फ्लायओव्हरवर सकाळपासून गोंधळाचे वातावरण होते. वाहतुकीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी कुठेही दिसत नव्हते. अंधेरी मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या फेरीवाल्यांनी गजबजलेल्या रस्त्यावर बसणाऱ्यांची समस्या आणखी वाढली आहे अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली.
गोखले पुलाच्या पूर्वेकडे बांधकाम सुरू असलेला नवीन उड्डाणपूल किमान दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी पडून राहणार आहे. पूर्व ते पश्चिम आणि त्याउलट कनेक्टिव्हिटीवर प्रचंड परिणाम होईल ज्यामुळे विशेषतः पावसाळ्यात जेव्हा अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद झाल्यावर गोंधळाची स्थिती निर्माण होईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
यावर अंतरिम उपाय म्हणून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेकडे त्याच्या दक्षिणेकडे जाणार्या रेल्वे पुलाला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वापरासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव द्यावा अशी मागणी अँड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेल द्वारे केली असून सदर प्रत त्यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिली आहे.
सावित्री नदीवरील पुलाची पुनर्बांधणी ६ महिन्यांच्या विक्रमी वेळेत झाले. मग गोखले पूलाच्या उभारणीला जास्त वेळ का लागणार असा सवाल त्यांनी केला.तसेच गोखले पूलाच्या पुनर्बांधणीसाठी निविदा काढून पूलाचे बांधकाम ६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणाऱ्या कंत्राट मोठा बोनस द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य सरकार आणि मुंबई महापालिका दोन्ही आमच्या प्रस्तावावर योग्य विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"