बंदमुळे रुग्णालयीन सेवेवर झाला अंशत: परिणाम, जे.जे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:31 AM2020-01-09T05:31:04+5:302020-01-09T05:31:08+5:30
कामगार बंदचा मुंबईतील रुग्णालयीन सेवेवर अंशत: परिणाम दिसून आला.
मुंबई : कामगार बंदचा मुंबईतील रुग्णालयीन सेवेवर अंशत: परिणाम दिसून आला. राज्य सरकारी, तसेच पालिका अखत्यारीतील कर्मचारी संघटनांनी बंदला निव्वळ पाठिंबा दिला. मात्र, जे.जे. रुग्णालय समूहासह चार रुग्णालयांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते. त्याचप्रमाणे, नायर रुग्णालयात कर्मचारी धोरणाविरोधात अधिष्ठात्यांना परिचारिका संघटनेकडून निवेदन देण्यात आले. राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे.जे. रुग्णालय समूह रुग्णालयातील अडीच हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.
राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या विद्यमाने सर जे.जे. समूह रुग्णालयातील वर्ग तृतीय, तसेच चतुर्थ कर्मचारी व नर्सेस फेडरेशन या संघटनेचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले. संपकाळात रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी संपावर असल्याने रुग्णसेवा व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे काम ठप्प झाले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली. यावेळी एमबीबीएस, बीपीएमटी, डीएमएलटी आणि विद्यार्थी परिचारिका यांची मदत घेण्यात आली होती, पण विद्यार्थी, निवासी अधिकारी व डॉक्टर यामुळे रुग्णसेवेवर बंदचा परिणाम दिसून आला नाही. आज दिवसभरात बाह्य रुग्ण कक्षात २,८३८ रुग्ण, तर आंतररुग्ण कक्षात ७० ते ८० रुग्णांना तपासण्यात आले, अशी माहिती जे.जे. रुग्णालय अधिष्ठाता
डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.