तरुणाईत कपड्यांच्या रंगांची, गरबा-दांडियाची क्रेझ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:44 AM2019-09-30T03:44:02+5:302019-09-30T03:44:20+5:30
नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू झाली आहे़ नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा-दांडिया खेळणे याकडे तरुणांचा ओढा आहे.
मुंबई : नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू झाली आहे़ नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा-दांडिया खेळणे याकडे तरुणांचा ओढा आहे. यंदाच्या नवरात्री उत्सवाबद्दल तरुणाईचे काय मत आहे, हे ‘लोकमत’ने या निमित्ताने जाणून घेतले.
तरुणी पूर्वा जोशी हिने सांगितले की, नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्रौत्सव म्हटला जातो. नवरात्रीत भक्ती भावनेने आणि पूर्ण श्रद्धेने मी हे उपवास करते. नवरात्रीत नऊ दिवसांचे नऊ रंग घालायला मला खूप आवडते. हे रंग फॉलो करणे आता ट्रेण्ड बनला आहे.
या दिवसांत अगदी उत्साहाने गरबा-दांडिया खेळायला खूप आवडते. या नऊ दिवसांत अगदी धम्माल-मस्ती केली जाते. उत्सवाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात.
तरुणी ममता महाडिक म्हणाली की, माझा नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतो. माझ्या मनातील महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात. मनामध्ये योजलेले उद्दिष्ट प्राप्त व्हावेत. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे शारीरिक व मानसिक ताणतणाव दूर व्हावेत व आरोग्य सुलभ राहावेत, यासाठी मी उपवास धरते.
भारतीय संस्कृतीनुसार नवरात्री हा गुजराती बांधवांचा सण आहे. देवींची आराधना करण्यासाठी वेशभूषा करून देवीच्या समोर दांडिया रास खेळले जाते. नवरात्री या सणाची मी आतुरतेने वाट पाहते. कारण विविध कलागुणांना वाव देण्याची संधी मिळत असते. त्याचप्रमाणे, नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करायला मिळतात. अनोळखी व्यक्तींचा परिचय होतो. मित्रमंडळी दांडिया खेळण्यासाठी एकत्र येतात, त्यातून मनाला खूप आनंद होतो.
तरुण चैतन्य काळे म्हणाला की, माझ्यासाठी नवरात्र ही संकल्पना एका सात्विक व्रतासारखी आहे. मी देवीची पूजा करतो, पण उपवास करत नाही; उपास करण्यापेक्षा मी उपासना करण्यावर अधिक भर देतो. या दिवसांमध्ये सभोवताली प्रचंड चैतन्य दिसून येते. सकारात्मकता प्रचंड प्रमाणात वाढते. मी स्वत: दांडिया, गरबा किंवा भोंडला या प्रकारचे पारंपरिक खेळ खेळत नाही, पण पाहायला जातो. एकंदरीत नवरात्र हे स्त्री शक्तीचे कौतुक आणि आदर करण्याचा सण आहे.