गर्भाशय शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातच राहिला कपडा, दाेन स्त्रीराेग तज्ज्ञांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 07:53 AM2021-03-07T07:53:00+5:302021-03-07T07:53:23+5:30
महिलेचा मृत्यू; मालाडमधील दाेन वर्षांपूर्वीचा प्रकार; दाेन स्त्रीराेग तज्ज्ञांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान एक मॉप (कपडा) शरीराच्या आतच विसरणाऱ्या दोन स्त्रीरोग तज्ज्ञांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे गेली दोन वर्षे रुग्ण महिलेला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या आणि अखेर यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मालाड पूर्वच्या केदारमल रोडवर जीवन मॅटर्निटी आणि जनरल हॉस्पिटल आहे. ते डॉ. सरिता रेलान आणि त्यांचे पती राहुल रेलान चालवतात. गंगा सेन (४५) नामक महिला ही मालाड पूर्व परिसरात तिच्या कुटुंबासोबत राहत होती. जानेवारी, २०१९ दरम्यान त्यांना मासिक पाळीदरम्यान अतिरिक्त रक्तस्रावाचा त्रास होऊ लागला. फॅमिली डॉक्टरांनी त्यांना जीवन रुग्णालयात हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १३ जानेवारी २०१९ रोजी त्यांच्यावर जीवन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. मात्र त्यानंतरही अधूनमधून त्यांच्या पोटात दुखायचे.
दरम्यान, त्यांचा मुलगा राहुल याचे लग्न ठरले आणि कुटुंब उदयपूरला गेले. तिथे गंगा यांची प्रकृती अधिकच खालावली. औषधाेपचारानंतरही त्यांना आराम मिळत नव्हता. त्यांना ताप आला आणि उलट्या होऊ लागल्याने तातडीने कुटुंबीयांनी त्यांना उदयपूरच्या जे. के. रुग्णालयात दाखल केले. तिथल्या डॉक्टरांना सिटी स्कॅन केले. यात सेन यांच्या शरीरात कपडा असल्याचा प्रकार उघडकीस आला.
कपड्यामुुळे झाला संसर्ग
nजे. के. रुग्णालयात शस्त्रक्रिया करून तो कपडा काढला. या शस्त्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली.
nकपड्यामुळे सेन यांच्या शरीरात संसर्ग झाल्याचे उदयपूरमधील डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतरही सेन दोन महिने वेगवेगळ्या रुग्णालयांच्या खेपा घालत होत्या.
nअखेर २६ जुलै रोजी त्यांचा घरी मृत्यू झाला. या प्रकरणी सेन कुटुंबीयांनी दिंडोशी पोलिसांत तक्रार केली होती.
अद्याप अटक नाही
मेडिकल कॉलेजच्या अहवालानंतर आम्ही दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून लवकरच कारवाई करण्यात येईल.
- धरणेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिंडोशी पोलीस ठाणे