दिवाळीच्या तोंडावर कपडा मार्केट बंद राहणार!
By admin | Published: October 11, 2016 05:52 AM2016-10-11T05:52:02+5:302016-10-11T05:52:02+5:30
मुंबईकरांच्या पसंतीच्या आणि सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या मंगलदास, कपड्याच्या पाच प्रमुख बाजारपेठा ऐन दिवाळीच्या तोंडावर बंद
चेतन ननावरे / मुंबई
मुंबईकरांच्या पसंतीच्या आणि सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या मंगलदास, कपड्याच्या पाच प्रमुख बाजारपेठा ऐन दिवाळीच्या तोंडावर बंद राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील सी वॉर्डमधील मुळजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, काकड मार्केट, आर जे मार्केट या पाच बाजारांमधील गुमास्ता कामगार विविध मागण्यांसाठी १४ आॅक्टोबरपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
एका गुमास्ता कामगाराने दिलेल्या माहितीनुसार, कपडा मार्केटमधील गुमास्ता कामगारांनी व्यापाऱ्यांविरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे. वेतनवाढीच्या प्रश्नामुळे गुमास्तांचे शोषण होत आहे. त्यामुळेच ऐन दिवाळीच्या तोंडावर बेमुदत बंद ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत कपडा बाजारातील विविध १३ संघटनांची मिळून एक कृती समिती तयार केलेली आहे. मात्र त्याकडूनही कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चर्चा सुरू असून, लवकरच संपाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईतील या विविध बाजारपेठांतील सुमारे १० हजार दुकानांत एकूण २५ हजार गुमास्ता काम करतात. मात्र तुटपुंज्या वेतनावर व्यापारी कामगारांचे शोषण करत आहेत. मात्र दसरा आणि मोहरमच्या मुहूर्तावर ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून तूर्तास बंद पुकारत नसल्याचे एका कामगाराने सांगितले. आठ दिवसांत व्यापाऱ्यांनी कोणतीही चर्चा केली नाही, तर बेमुदत संपाची घोषणा करण्याची शक्यताही त्या कामगाराने व्यक्त केली आहे.
कोणते बाजार होणार बंद?
मागण्या मान्य झाल्या नाही, तर सी वॉर्डमधील मुळजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, काकड मार्केट, आर जे मार्केट या बाजारांमधील गुमास्ता कामगार बंदमध्ये सामील होणार आहेत. या ठिकाणी नव्या कामगारांसोबत सुमारे ३५ वर्षांपासून काम करणारे गुमास्ता आहेत. त्यात नवीन गुमास्ता कामगारांना ५ ते ६ हजार रुपये, तर ३५ वर्षे काम करणाऱ्या कामगारांना ९ ते १० हजार रुपये पगार मिळतो. एवढ्या तुटपुंज्या वेतनावर जगायचे तरी कसे, असा सवाल कामगार वर्गातून उपस्थित केला जात आहे....म्हणून बाजार बंद पडतील!
प्रत्येक ग्राहकाची आवड जपल्यानंतर ढीगभर कपड्यांची घडी घालणे, एकट्या मालकाच्या आवाक्याबाहेरील आहे. याच सर्व कामांसाठी कपडा बाजारपेठेतील एकाच दुकानात किमान एका गुमास्तापासून पाच ते सहा गुमास्ता कामगार काम करताना दिसतात. त्यांच्याशिवाय कपडा बाजार सुरू राहणे कठीण आहे.
गव्हांदे अॅवॉर्डला केराची टोपली
१९९३ रोजी सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती राजाराम गव्हांदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने गुमास्ता कामगारांचे सर्वेक्षण करून काही शिफारशी केल्या होत्या. त्यानंतर कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा तीन प्रकारांत कामगारांसोबत व्यापारी करार करून वेतन ठरवत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून व्यापाऱ्यांनी करार न करता सरकारी आदेशालाही केराची टोपली दाखविल्याचे बोलले जात आहे.