मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मेघ या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असली तरी त्याची आगेकूच आखाताच्या दिशेने होते आहे. त्यामुळे या वादळाचा मुंबईला धोका नाही, असे स्पष्ट करीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबईकरांना दिलासा दिला आहे.मध्य-पूर्व अरबी समुद्रात असलेल्या मेघ या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, आता ते अधिक तीव्र झाले आहे. नैर्ऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, आता ते नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरावर आहे. गेल्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १०, ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २२ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
मेघ चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही
By admin | Published: November 09, 2015 3:23 AM