- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कधी घ्यायचे याविषयी अद्याप अनिश्चितता आहे. गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कामकाज सल्लागार समितीची बैठक कधी घ्यायची, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वीय सहायकास कोरोनाची लागण झाली असून पटोले यांना १४ दिवस क्वॉरंटाईन होण्याची सूचना केली जाऊ शकते, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकमतला सांगितले की, अधिवेशनाची अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. कामकाज सल्लागार समितीची बैठक सरकार ठरवेल. त्यानंतर पुढील नियोजन केले जाईल. विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनाची तयारी सुरू केली असून बैठक व्यवस्थेपासून वेगवेगळे पर्याय तपासण्याचे काम सुरू आहे.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यालयातील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासूनतेही विधानभवनात आलेले नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा दूरध्वनी बंद आहे. अधिवेशनात गणपूर्तीअभावी कामकाज बंद पडण्याचे प्रकार घडतात. मात्र ही अट रद्द केली जावी, अशी विनंती अध्यक्ष आणि सभापतींना करण्यात येणार आहे. २८८ सदस्यांच्या सभागृहात दोन सदस्यांमध्ये एका सदस्याचे अंतर ठेवायचे नियोजन केले तर सगळ्या सदस्यांना बसता येणार नाही. त्यामुळे काही सदस्यांना अधिकाºयांसाठीच्या गॅलरीत, तसेच प्रेक्षक गॅलरीत देखील बसवता येईल का? याचाही विचार विधिमंडळ करत आहे.
३ दिवसांचे अधिवेशन?
जास्तीत जास्त तीन दिवसांचे अधिवेशन घेऊन त्यात पुरवणी मागण्या आणि महत्त्वाचे कामकाज करून घ्यावे, असा एक प्रस्ताव आहे. तर गणपतीनंतर अधिवेशन घ्यावे, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले आहे.