मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानात गुरुवारपासून १ अंशाची घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ३४ अंश सेल्सिअसवर स्थिर असणारे कमाल तापमान ३३ अंशांवर आले आहे. शिवाय मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी ढग दाटून येत आहेत. दुपारी एक ते तीन वाजेपर्यंतचा काहीसा कालावधी वगळला तर दाटून आलेल्या ढगांमुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून किंचित दिलासा मिळत आहे. येथील ढगाळ वातावरण शनिवारसह रविवारी कायम राहील, असे हवामान खात्याचे म्हणणे असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. ४ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ५ ते ७ मे दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ४ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.