Join us

ढगाळ वातावरणामुळे सुपर मून पाहण्यात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ढगाळ वातावरणामुळे सुपर मून पाहण्यात अडथळे आल्याने खगोलप्रेमींचा भ्रमनिरास झाला. मुंबईकरांना या सुपर मूनचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ढगाळ वातावरणामुळे सुपर मून पाहण्यात अडथळे आल्याने खगोलप्रेमींचा भ्रमनिरास झाला. मुंबईकरांना या सुपर मूनचे दर्शन घेता यावे यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बुधवारी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपर मून पाहता येईल, या आशेने खगोलप्रेमी रात्री आकाशाकडे डोळे लावून बसले होते; परंतु ढगाळ हवामानाने वाटेत अडथळे आणले. सुपर मून पाहण्यासाठी नेहरू विज्ञान केंद्राने आयोजित केलेला कार्यक्रम बुधवारी रात्री ८.३० वाजता सुरू झाला; परंतु विज्ञानप्रेमींना ऑनलाइन पद्धतीनेही सुपर मूनचे दर्शन घेता आले नाही.

आता २०२२ मध्ये १४ जून व १३ जुलै रोजी सुपर मून स्थिती होणार आहे; परंतु ते दिवस पावसाळ्याचे असल्याने दर्शन होणे कदाचित कठीण जाणार आहे. २०२३ मध्ये सुपर मून दिसणार नाही. २०२४ मध्ये १८ सप्टेंबर व १० ऑक्टोबर, २०२५ मध्ये ५ नोव्हेंबर व ४ डिसेंबर आणि २०२६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सुपर मूनचे दर्शन होणार आहे.