मुंबई : मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३४ अंश नोंदविण्यात आले असतानाच, १९ आणि २० मार्च रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशाच्या आसपास राहील. १९ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गेल्या २४ तासांत विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागांतकिंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर असून, किमान तापमान २० ते २१ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईकरांना अनुभवता येणारी थंडी गेल्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे. कारण तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. पुढील काळात तापमानवाढीचा हा कल असाच कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परिणामी, आता मुंबईकरांना उन्हाचे आणखी चटके बसणार आहेत.
मुंबईत आज ढगाळ वातावरण; विदर्भाला पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:10 AM