Join us

क्लस्टर विद्यापीठांमुळे सहकार्य वाढीस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 10:40 AM

अल्पावधीतच ही विद्यापीठेही नाव कमावतील. 

डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

क्लस्टर विद्यापीठ ही संकल्पना नक्की काय आहे? 

उत्तर : क्लस्टर विद्यापीठ एनईपीपूर्वीची संकल्पना असून, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात आली होती. त्यातून राज्यात यापूर्वीच तीन क्लस्टर विद्यापीठे स्थापन झाली आहेत. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ हे त्याचाच भाग आहे. कमी विद्यार्थी संख्येच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सर्व साहित्य उपलब्ध होत नाही. या कॉलेजकडे संसाधनांची कमी असते. अशावेळी एकाच संस्थेची अथवा भिन्न संस्थेची दोन ते पाच कॉलेजेस एकत्र येऊन क्लस्टर विद्यापीठ स्थापन करू शकतील. यातील प्रमुख कॉलेजमधील विद्यार्थी संख्या कमीतकमी दोन हजार असावी लागणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय शिक्षण घेता येईल. कॉलेजना त्यांच्याकडील संसाधने एकमेकांना देता येतील. 

क्लस्टर विद्यापीठात कशा प्रकारचे अभ्यासक्रम असतील ? 

उत्तर : एनईपीत सहा व्हर्टिकलवर भर देण्यात आला असून, बहुविद्याशाखीय सहकार्य वाढविण्यास सांगितले आहे. आता कॉलेजना काही कोअर तर काही मायनर विषय शिकवावे लागणार आहेत. क्लस्टरमधील वेगवेगळी कॉलेजेस अन्य संलग्न कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी मायनर अभ्यासक्रम तयार करू शकतील. सध्या बीएड कॉलेजमध्ये केवळ बीएड हीच पदवी दिली जाते. क्लस्टरमध्ये बीएड आणि आर्ट्स, सायन्स कॉलेज एकत्र आल्यास त्यांना एकत्रितरीत्या बीए बीएड, बीएससी बीएड, अशी एकत्रित पदवी घेता येईल. एनईपीमध्ये ड्युअल डिग्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यातून क्लस्टर विद्यापीठातील विविध कॉलेजमधील वेळापत्रक तपासून विद्यार्थी दोन अभ्यासक्रमांना एकाचवेळी प्रवेश घेऊ शकेल. क्लस्टर विद्यापीठ झाल्याने मुंबई विद्यापीठावर कसा परिणाम होईल ? 

उत्तर : विद्यापीठाकडून स्वायत्त कॉलेजची संख्या वाढावी, त्यांना इम्पोर्ट ऑटोनॉमी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एनईपीनुसार २०३० ते २०३५ दरम्यान कॉलेजना संलग्नता ही संकल्पना संपुष्टात येणार आहे. क्लस्टर विद्यापीठामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली कॉलेजेस बाहेर पडणार आहेत. शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ही बाब चांगली असली, तरी मुंबई विद्यापीठातील काही गुणवान कॉलेजेस बाहेर पडणार असल्याने विद्यापीठाचे नुकसान होईल, याची कल्पना आहे. मात्र, क्लस्टर होणे ही काळाची गरज आहे.  

मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात कसा प्रभाव पडेल? 

उत्तर : क्लस्टर विद्यापीठांमुळे मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये मोठा प्रभाव पडेल. मुंबईतील अनेक कॉलेजेस क्लस्टर विद्यापीठ होण्यास उत्सुक आहेत. या क्लस्टरमध्ये युजीसीकडून आणि अन्य योजनांतून मिळालेल्या शैक्षणिक साहित्याची सहजरीत्या एकमेकांशी देवाणघेवाण करता येईल. ही जमेची बाजू असेल. मात्र, मानवी संसाधनाची सुयोग्यरीत्या देवाणघेवाण करण्याचे आव्हान असेल. त्यासाठी संवाद ठेवावा लागेल. 

क्लस्टरमधील स्वतंत्र पदवीमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येतील का? उत्तर : मुंबई विद्यापीठाला मोठी परंपरा लाभली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आलेला आहे. नव्याने तयार होणारी विद्यापीठे आणि मुंबई विद्यापीठाची पदवी या दोन्हींमध्ये फरक राहणार आहे, क्लस्टरमध्ये सामाविष्ट होणाऱ्या लीड कॉलेजनीही नाव कमावले आहे. त्यांचा शैक्षणिक दर्जाही चांगला आहे.  अल्पावधीतच ही विद्यापीठेही नाव कमावतील. 

 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ