Join us

केबल चालकांच्या ब्लॅक आऊटमुळे ग्राहकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 7:16 AM

वाहिन्यांच्या दराबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांना विरोध दर्शवण्यासाठी केबल आॅपरेटर अ‍ॅन्ड ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने गुरुवारी सायंकाळी सातपासून तीन तास केबल बंद ठेवत वेठीला धरल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मुंबई : वाहिन्यांच्या दराबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांना विरोध दर्शवण्यासाठी केबल आॅपरेटर अ‍ॅन्ड ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने गुरुवारी सायंकाळी सातपासून तीन तास केबल बंद ठेवत वेठीला धरल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोणतीही पूर्वसूचना न देता केबल बंद ठेवल्याबद्दल अनेक ग्राहकांनी जाब विचारला. काहींनी तर पैसे परत देण्याची मागणी केली, तर काही ठिकाणी केबल प्रसारणाच्या दर्जाच्या दर्जावरूनही ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.या आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा केबलचालकांच्या संघटनेने केला आहे. मुंबई व परिसरातील सुमारे आठ हजार केबल व्यावसायिकांनी यात सहभाग घेतल्याने सुमारे २० लाख घरांच्या टीव्हीवरील प्रक्षेपण बंद झाल्याचा दावा त्यांनी केला. प्राईम टाईममध्ये ब्लॅक आऊट करुन निषेध नोंदवल्याचा दावा संघटनेने केला.ज्या ग्राहकांना आंदोलनाची माहिती नव्हती त्यांनी आणि ज्यांना कल्पना होती त्यांनीही प्रसारण बंद होताच केबल कार्यालयात धाव घेत जाब विचारला. ग्राहकाचा संताप पाहून, त्यांचे सतत येणारे फोन पाहून अनेक केबल व्यावसायिकांनी काही काळ फोन बंद ठेवले, तर काहींनी कार्यालये बंद केली.सर्व केबल व्यावसायिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे लढा यशस्वी होईल व केबल व्यावसायिकांना न्याय मिळेल, असा विश्वास शिव केबल सेनेचे राजू पाटील, मनसे केबल सेनेचे तुषार आफळे व मुंबई केबल नेटवर्क असोसिएशनचे विश्वनाथ गिरकर यांनी व्यक्त केला.नवी मुंबईतही नाराजीनवी मुंबई, पनवेल,उरण व रायगडमधील जवळपास चार लाख घरांमधील टीव्ही एकाच वेळी बंद होते.अनेक ग्राहकांना या बंदविषयी माहितीच नव्हती. त्यांनी केबलचालकांच्या बंदविषयी नाराजी व्यक्त केली.वसईत बंद मागेवसई शहर व परिसरातील केबलचालकांनी केबल बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन केबलचे प्रसारण चालू ठेवल्याने येथील ४० हजार ग्राहकांना दिलासा मिळाला.रायगडमध्ये डीटूएच सुरळीतरायगड जिल्ह्यातील डी टू एच सेवा सुरळीत सुरू होती. रायगड जिल्ह्यात एक लाख दोन हजार ९७८ केबल जोडण्या आहेत. त्यातील ग्रामीण भागात ८७ हजार ११४ आणि शहरी भागात १५ हजार ८६४ केबल जोडण्या आहेत.अचानक केबल प्रक्षेपण बंद झाल्याने काही काळ नेमके काय झाले ते कळलेच नाही. केबल बंद करण्यापूर्वी ग्राहकांना एसएमएस किंवा इतर मार्गाने कळवण्याची गरज होती. केबल व्यावसायिकांनी यासाठी ग्राहकांची माफी मागून या कालावधीचे पैसे ग्राहकांना परत करण्याची गरज आहे.- सचिन माने, वरळीकेबल व्यावसायिक व ट्रायच्या वादाचा फटका नागरिकांना का? दर कमी होतील किंवा वाढतील याचा निर्णय पुढे होईलच. मात्र महिन्याचे पूर्ण शुल्क दिलेले असताना केबल अशा मनमानी पध्दतीने बंद करणे चुकीचे आहे.- राकेश पाटील, कुर्लाकेबल बंदचा निर्णय घेण्यापूर्वी ग्राहकांना त्याची माहिती देणे आवश्यक होते. ट्रायच्या नियमावलीचा निषेध करताना ग्राहकांच्या हिताचे मोठे दावे केले जात आहेत. मात्र, या निर्णयाची माहिती ग्राहकांना द्यावी, असे असे कोणत्याही केबल व्यावसायिकांना वाटले नाही, ही दुर्देवाची बाब आहे. त्यामुळे ग्राहकांत चीड आहे.- शाहिन बोरकर, गृहिणी, मालाडकेबल व्यावसायिकांनी कोणतेही आंदोलन केले तरी या निर्णयाची अंमलबजावणी होणारच आहे. केबल सुरु झाल्यापासून आजपर्यंत ग्राहकांची लूट झाली आहे. नवीन नियमामुळे ग्राहक राजा बनणार आहे, त्यामुळे केबल व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. ट्रायच्या नियमावलीविरोधात लढताना ग्राहकांना वेठीला धरण्याची नेहमीची परंपरा या निर्णयामुळे कायम राहिली आहे. मात्र, ग्राहक आता त्यांच्या दिखाव्याला फसणार नाहीत.- वर्षा राऊत, मुंबई ग्राहक पंचायत ठाण्यात डिशटीव्ही, अ‍ॅप्समुळे ब्लॅक ‘आउट’ठाण्यात घरोघरी असलेल्या डिशटीव्हीवर आणि मोबाइलवर डाउनलोड केलेल्या वाहिन्यांच्या अ‍ॅप्सवर आपल्या पसंतीच्या मालिका व कार्यक्रम पाहून दर्शकांनी केबलचालकांच्या ब्लॅक आउटलाच ‘आउट’ केले. ज्यांच्या घरी केवळ केबल कनेक्शन आहे, त्या मोजक्याच ग्राहकांना या आंदोलनाचा फटका बसला.मात्र, त्यांनी फिरायला जाऊन किंवा कुटुंबासमवेत वेळ घालवून अथवा वेबसिरीज पाहून आपली करमणूक करून घेतली.ग्राहकांना आपल्या पसंतीच्या वाहिन्या निवडण्याच्या ‘ट्राय’ने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ केबलचालकांनी ब्लॅक आउट केला. मात्र, केवळ ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाख असून संपूर्ण जिल्ह्यातील केबलग्राहकांची संख्या दीड ते दोन लाख आहे.त्यामुळे ग्रामीण भागात किंवा शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये जेथे केबल कनेक्शद्वारे टीव्ही पाहिला जातो, अशा दर्शकांनाच या आंदोलनाचा फटका बसला. अनेकांनी अ‍ॅप्स डाउनलोड करून लॅपटॉप किंवा मोबाइलवर आपल्या आवडीच्या सिरीयल्स पाहिल्या.

टॅग्स :टेलिव्हिजनमहाराष्ट्र