मुंबई : आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाने रखडलेल्या निकालांमुळे, मुंबई विद्यापीठाची बरीच नाचक्की झाली, पण यापुढे असा गोंधळ खपवून घेतला जाणार नाही. जो प्रकार आता झाला आहे, तो प्रकार आगामी परीक्षेच्या वेळी होऊ देऊ नका, अशी तंबीच राज्यपाल विद्यासागर राव यांनी रविवारी विद्यापीठ प्रशासनाला दिली. शिवाय, राखीव आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर जाहीर करतानाच, आगामी परीक्षांचे निकाल ३० दिवसांतच जाहीर होतील, याची खबरदारी घेण्याची सूचना राज्यपालांनी केली.मुंबई विद्यापीठाने नुकतेच रखडलेल्या ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राजभवनात विशेष आढावाबैठक घेतली.या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी प्रकुलगुरू डॉ. धीरेन पटेल, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. रखडलेले निकाल जाहीर केल्याबद्दल, प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतानाच, परीक्षा विभागाने राखीव ठेवलेले ११ हजार ९८१ निकाल प्राधान्याने जाहीर करावेत. शिवाय, ज्या ४६,८०६ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत, त्यांचे निकालही वेळेत जाहीर करण्याची सूचना राज्यपालांनी केली. परीक्षा आणि निकालातील सुधारणांबाबत रोड मॅप आखतानाच, आॅनलाइन असेसमेंटसाठी सॉफ्टवेअर, तसेच अन्य तांत्रिक कमतरता राहणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याची सूचनाही राज्यपालांनी केली.या वेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील विद्यापीठाचे कान टोचले. जो प्रकार यंदाच्या परीक्षेदरम्यान झाला आहे, त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून खबरदारीच्या सर्व उपाययोजना आखा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई विद्यापीठ हे देशभरातील विद्यापीठातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक असून, त्यामुळे येत्या काळात गोंधळ होणार नाही, याची योग्य ती काळजी घ्या, यासाठी संबंधितांना योग्य ते प्रशिक्षणदेखील द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.
निकालाचा गोंधळ यापुढे चालणार नाही, राज्यपालांची विद्यापीठाला तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 3:19 AM