तेजस वाघमारे , मुंबईम्हाडामार्फत २0१२मध्ये काढण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या लॉटरीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या लॉटरीत बहुतांश गिरणी कामगारांना दोन घरे मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विजेत्या कामगारांची नावेही प्रतीक्षा यादीत आल्याने गिरणी कामगारांच्या काढण्यात आलेल्या लॉटरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराची चौकशी करून गिरणी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेने केली आहे.मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना घरे देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार म्हाडामार्फत गिरणी कामगारांची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाने सारस्वत बँकेमार्फत प्रथम कामगारांची माहिती संकलित केली. या वेळी १ लाख १0 हजार कामगारांनी अर्ज केले. गिरणी कामगार संघटनांनी कामगारांच्या वारसानाही या प्रक्रियेत सामावून घेण्याची मागणी केल्यानंतर म्हाडाने अॅक्सिस बँकेमार्फत उर्वरित कामगार आणि मृत कामगारांच्या वारसदारांची माहिती संकलित केली. त्यामुळे म्हाडाकडे सुमारे १ लाख ४८ हजार ६७ गिरणी कामगारांचे अर्ज आले.दोन बँकांमार्फत कामगारांची माहिती संकलित करण्यात आल्याने अनेकांनी पुन्हा अर्ज भरले. त्यामुळे अनेक कामगारांचे एकाच नावाचे २ ते ७ अर्ज केले होते. अर्जांची छाननी करण्याच्या कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत म्हाडाने काढलेल्या लॉटरीमध्ये अनेक गिरणी कामगारांना २ घरे मिळाली आहेत. त्याचप्रमाणे या कामगारांची नावे प्रतीक्षा यादीमध्ये आली आहेत. हा प्रकार सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉ. बी.के. आंब्रे यांनी म्हाडाने संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे उघडकीस आणला आहे.
गिरणी कामगारांच्या लॉटरीमध्ये गोंधळ
By admin | Published: August 03, 2015 2:07 AM