Join us

मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले, वाद-विवादास तयार: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 2:47 AM

...अन्यथा ‘फडणवीस दामदुप्पट पदार्फाश महामेळावे’ भरवण्याचे प्रतिआव्हान

मुंबई : गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने दुप्पट काम केले असून, त्याबाबत कुठल्याही व्यासपीठावर वाद-विवाद करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रचार प्रमुख या नात्याने आपण स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ व स्थळ निश्चित करावे, असे आव्हान माजी खासदार नाना पटोले यांनी दिले आहे.पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आमचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्यास राज्यात ज्या ज्या ठिकाणी त्यांनी महाजनादेश यात्रा आयोजित केल्या आहेत, तेथेच काँग्रेसच्या वतीने ‘फडणवीस दामदुप्पट पदार्फाश महामेळावे’ आयोजीत करून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडणार असल्याचे पटोले म्हणाले. फडणवीस हे महाजनादेश यात्रांमध्ये दुप्पट काम केल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांचे वक्तव्य म्हणजे गावोगावी फिरून जनतेला ‘दुप्पट सोने’ करून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्यांची सुधारीत आवृत्ती असल्याचा आरोप पटोले यांनी केला.२०१४-१५ पासून राज्यसरकारने जनतेवर पेट्रोल डिझेलवर दुष्काळ कर, ४.५० ते ६.५० रूपयांचा जिझीया कर लावला. गेल्या पाच वर्षांत किती कर गोळा झाला? तो दुष्काळावरच खर्च केला का? त्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी. मोझरी जिल्हा अमरावती येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार पेक्षा जास्त गावे राळेगणसिद्धी सारखी आदर्श पाणलोट क्षेत्र म्हणून विकसीत केली असून, २५ हजार पेक्षा जास्त गावात पाणलोट विकासाची कामे सुरू आहेत, अशी दामदुप्पट थाप ठोकली आहे. त्यांनी त्या २ हजार गावांची यादी जाहीर करावी, असेही पटोले म्हणाले.‘मुख्यमंत्र्यांनी केला महाघोटाळा’गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तीसाठी एस.डी.आर.ए./एन.डी.आर.ए. मधून जी १६,५०० कोटींपेक्षा जास्त मदतनिधी दुष्काळग्रस्तांसाठी आला. तो आपत्ती मदत निधी मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या राज्य आपत्ती निवारण प्रधिकरणाने एस.डी.आर.एफ.च्या स्वतंत्र खात्यात न ठेवता बीडीएसद्वारे बेकायदेशीर का खर्च केला? याचा खुलासा करावा आणि या महाघोटाळ्याची तातडीने चौकशी करून स्वत:ची जबाबदारी निश्चित करून घ्यावी. अन्यथा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे सत्कर्म आम्हाला करावे लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :नाना पटोलेदेवेंद्र फडणवीस