हवामान खात्यावर मुख्यमंत्री नाराज! २९ आॅगस्टची अतिवृष्टी, मुंबई पोलिसांचे मात्र कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:09 AM2017-09-15T04:09:03+5:302017-09-15T04:09:17+5:30
२९ आॅगस्ट रोजी मुंबई आणि उपनगरात झालेल्या अतिवृष्टीची पूर्वसूचना न दिल्याबद्दल हवामान खात्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून तसे पत्र त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिले आहे.
मुंबई : २९ आॅगस्ट रोजी मुंबई आणि उपनगरात झालेल्या अतिवृष्टीची पूर्वसूचना न दिल्याबद्दल हवामान खात्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून तसे पत्र त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिले आहे.
२९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईकरांचे हाल झाले. रस्त्यांवर व रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. मात्र, या पावसाची पूर्वसूचना हवामान खात्याकडून मिळाली असती तर उपाययोजना करता आल्या असत्या. उलट, दुसºयादिवशी (३० आॅगस्ट) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यानुसार शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली. खासगी आस्थापनांना अत्यावश्यक मनुष्यबळ कामावर घेण्यास सांगून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यादिवशी ऊन पडले होते. हवामान खात्याच्या या लहरी अंदाजावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत तसे पत्र केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना पाठवले आहे.
पोलिसांना ५ कोटींचे बक्षीस
अतिवृष्टीत मुंबईकरांना साथ देणा-या पोलिसांच्या पाठीवर राज्य सरकारने कौतुकाची थाप देत पाच कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गृहविभागाने गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. गणेशोत्सव ( २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर), बकरी ईद ( २ सप्टेंबर) च्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी चोख पार पाडले. गृह मंत्रालयाच्या जीआरनुसार बक्षिसाची रक्कम पोलीस महासंचालकांना दिली जाईल.