Join us

मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 7:45 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Ghatkopar Hording ( Marathi News ) :मुंबईतील घाटकोपर इथं लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती असून आतापर्यंत जवळपास ५० जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच होर्डिंगखाली अडकलेल्या इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घाटकोपर दुर्घटनेचा आढावा घेतल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "घाटकोपर इथं झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेबाबतची माहिती मिळताच मी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना बचावकार्याचे आदेश दिले. आतापर्यंत अनेक जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदर होर्डिंग अनधिकृत होते की नाही, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. मात्र हे होर्डिंग अनधिकृत असेल तर होर्डिंग मालकावर कारवाई केली जाईल. तसंच वादळ-वाऱ्यात होर्डिंग कोसळू नये म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मी आयुक्तांना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या आकारापेक्षा मोठे होर्डिंग लावू नयेत, महापालिकेचा परवाना असल्याशिवाय अशी होर्डिंग उभारली जाऊ नयेत, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत," अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

फडणवीस काय म्हणाले?

होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट लिहीत प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे. "घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलीस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई मान्सून अपडेटएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमुंबई महानगरपालिका