मुंबईः सरकारी नोकऱ्यांची 'मेगा भरती' होऊन गेली तर आम्हाला संधी मिळणार नाही, असं मराठा समाजातील तरुणांना वाटतंय. परंतु, असं काहीही होणार नाही. मेगा भरतीत त्यांच्या जागा इतर कुणालाही दिल्या जाणार नाहीत, त्यांनी कुठलीही शंका बाळगू नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एकमत झालं असून कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यावेळीच मेगा भरतीबाबत मराठा समाजात असलेला संभ्रमही त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मेगा भरती करू नका, अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे. कारण, एकदा मेगा भरती झाली की आपल्याला संधी मिळणार नाही, अशी शंका त्यांच्या मनात आहे. पण, या मेगा भरतीत अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्याही जागा आहेत. त्यांना ही भरती लवकर व्हावी असं वाटतंय. पण, मराठ्यांच्या जागा राखीव ठेवूनच मेगा भरती होईल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्याची तत्परतेनं छाननी केली जाईल आणि विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा कायदा केला जाईल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.