रात्री बारापर्यंत स्पीकर वापरण्याची परवानगी जास्तीतजास्त दिवस देण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:58 AM2019-08-15T06:58:37+5:302019-08-15T06:58:50+5:30
विसर्जन काळात ध्वनीक्षेपक आणि पारंपारिक वाद्यांच्या वापराबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गणेश मंडळांना दिले.
मुंबई : विसर्जन काळात ध्वनीक्षेपक आणि पारंपारिक वाद्यांच्या वापराबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गणेश मंडळांना दिले. गणेशोत्सव काळात जास्तीतजास्त दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वापराची परवानगी देण्याचा प्रयत्न करू. विसर्जन काळात रात्री बारानंतर आवाजाची मर्यादा सांभाळून पारंपारिक वाद्य वाजविण्यास मुभा देण्याची तयारी सरकारने दाखविली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा, सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. विसर्जनादिवशी रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी असते. यंदा २, ६, ७ आणि १२ सप्टेंबर या चार दिवशी ही परवानगी आहे. यंदा या चार दिवसांव्यतिरिक्त आणखी काही दिवस ही परवानगी देण्याची मागणी गणेश मंडळांनी केली. त्यावर आणखी काही दिवस परवागी देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. तर, रात्री बारानंतर टाळ, मृदंग, वीणा, लेझीम, झांज आदी पारंपारिक वाद्य वाजवता येती. परंतु अवाजाची मर्यादा पाळली जावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. पोलिसांनी आगमन, विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करावे. तसेच पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भूमिका घ्यावी. गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू, असेही फडणवीस यांनी सांगितले. गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघानी सूचविलेल्या सूचनांवर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री
उत्सव काळात गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली. विसर्जन मिरवणुकीत रात्री दहानंतर पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची मागणी पुण्यातील मंडळांनी केल्याची माहिती भेगडे यांनी दिली. यावेळी दहिबावकर, साळगावकर यांनी गणेशमंडळाच्या वतीने विविध सूचना केल्या.
पासपोर्टच्या धर्तीवर गणेश मंडळांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. गणेश मंडळांसोबतच सार्वजनिक उत्सव मंडळ, धर्मादाय संस्था, विश्वत मंडळांच्या नोंदणीसाठी ही आधुनिक प्रणाली वापरता येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.