DCM शिंदेंचा नवा वैद्यकीय कक्ष स्थापन; CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:28 IST2025-02-18T15:28:09+5:302025-02-18T15:28:17+5:30

CM Devendra Fadnavis PC News:

cm devendra fadnavis first clear reaction over deputy cm eknath shinde establish new medical help cell | DCM शिंदेंचा नवा वैद्यकीय कक्ष स्थापन; CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया म्हणाले...

DCM शिंदेंचा नवा वैद्यकीय कक्ष स्थापन; CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया म्हणाले...

CM Devendra Fadnavis PC News: नवे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मुद्द्यांवरून महायुतीत मानापमान नाट्ये घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच महायुतीत अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचा दावाही विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे यांनी या कक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असताना जे मुख्यमंत्र्यांचा कक्ष सांभाळत होते, त्या मंगेश चिवटे यांची नेमणूक केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. यावेळी त्यांच्याकडे विधी व न्याय खाते होते. म्हणून त्यांनी या खात्याशी संलग्न करत उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला होता. हे खाते आताही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरीही त्यांच्याकडेच आहे. यामुळे तो कक्ष त्याच खात्याशी जोडलेला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना आरोग्य खाते शिवसेनेकडे असल्याने नवा स्वतंत्र कक्ष स्थापन करावा लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेला नवा वैद्यकीय कक्ष हा थेट आर्थिक मदत न देता आरोग्य विभागाशी समन्वय साधून काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले.

उपमुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल तर...

यात काही चुकीचे नाही. मीदेखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो. वैद्यकीय कक्ष आपण यासाठी चालवतो की, त्यातून काही समन्वय साधता आला पाहिजे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे प्रकरणे येत असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल तर काही गैर नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे एक्सवर हँडल अस्तित्वात आहे. जे फडणवीस उपमुख्यमंत्री असताना वापरत होते. त्यावर १५ ऑक्टोबर, २०२५ पूर्वीची मदत केलेली अनेक पोस्ट आहेत. यावर आता २९ जानेवारीपासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष असे नाव बदलण्यात आले आहे. तसेच या तारखेपासून नवीन पोस्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे हे हँडल आता मुख्यमंत्री मदत कक्षाचे म्हणून ओळखले जात आहे.  

 

Web Title: cm devendra fadnavis first clear reaction over deputy cm eknath shinde establish new medical help cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.