CM फडणवीसांची दिशा सालियन प्रकरणात पहिली प्रतिक्रिया; सरकारची भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:48 IST2025-03-21T15:47:43+5:302025-03-21T15:48:38+5:30
CM Devendra Fadnavis First Reaction Over Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

CM फडणवीसांची दिशा सालियन प्रकरणात पहिली प्रतिक्रिया; सरकारची भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
CM Devendra Fadnavis First Reaction Over Disha Salian Case: सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणात पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना शासनाची भूमिका मांडत स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
दिशा सालियन प्रकरणात वकील निलेश ओझा यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत मोठी मागणी केली आहे. आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे ओझा यांनी म्हटले होते. दिशाचे वडील सतीश सालियन यांनीही माध्यमांशी संवाद साधताना अनेक दावे आणि गंभीर आरोप केले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिशा सालियन प्रकरणात पहिली प्रतिक्रिया
ही सगळी चर्चा न्यायालयातील याचिकेमुळे सुरू झाली. उच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनीही एक मुलाखत दिली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणते? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल. आत्तातरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आत्तातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, १४व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर एकही जखम कशी झाली नाही? हा प्रश्न दिशा सालियनच्या वडिलांनी उपस्थित केला. या आधारावर दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या वकिलांनी यात थेट आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सूरज पांचोली यांची आरोपी म्हणून नाव घेत खळबळ उडवून दिली आहे.