मुंबई: शिवसेना आणि भाजपा या 'मित्र'पक्षांचं गेल्या काही वर्षांमधील नातं संपूर्ण राज्यानं पाहिलेलं आहे. जाहीर सभांमधून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या, अफलजखानाची उपमा देणाऱ्या शिवसेना-भाजपामुळे राज्यातील जनतेचं चांगलंच मनोरंजन होतं. मात्र आता या दोन पक्षांमधील प्रेम उफाळून आलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कृतज्ञता पुरस्कार देऊ केला आहे. उद्धव ठाकरे जे माझ्यासमोर बोलतात, तेच माझ्या पाठीमागेदेखील बोलतात. समोर एक बोलायचं आणि पाठीमागे दुसरंच काहीतरी बोलायचं, असं ते करत नाहीत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक केलं. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंना कृतज्ञता पुरस्कार द्यायचा असल्यास तो कशासाठी द्याल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रण कौशल्याचं कौतुक केलं. 'राजकारण सोडून बोलायचं झाल्यास, उद्धव ठाकरे चांगले छायाचित्रकार आहेत. रायगडावर आम्ही महोत्सवाचं आयोजन केलं होतं. तेव्हा त्यांनी रायगडाचं सौंदर्य अतिशय उत्कृष्टपणे टिपलं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन उद्धवजींना पुरस्कार द्यायचा असेल, तर मी तो छायाचित्रणासाठी देईन,' असं फडणवीस यांनी म्हटलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या व्यक्तीमत्त्वाचंदेखील कौतुक केलं. आत एक आणि बाहेर एक असं उद्धव ठाकरे कधीही वागत नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. 'अनेकदा उद्धवजी भाषणं करतात. मीदेखील भाषण करतो. टीका होत असते. आरोप होत असतात. मात्र ते माझ्यासमोर एक बोलले आणि माझ्या पाठीमागे दुसरंच काही बोलले, असं कधीही होत नाही. उद्धवजी माझ्यासमोर माझ्याविषयी जे बोलतात, तेच माझ्यापाठीमागेही बोलतात. आत एक आणि बाहेर एक असं काही नसतं. राजकारणात हे खूप कमी पाहायला मिळतं,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली.
...म्हणून उद्धव ठाकरेंना कृतज्ञता सन्मान द्यायला हवा: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 9:32 AM