CM Devendra Fadnavis PC News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत अजित पवारांकडून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला गेला. अजित पवारांच्या दौऱ्यावेळी धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. परंतु, धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करून आजारी असल्यामुळे दौऱ्यात हजर राहू शकणार नाही, असे स्पष्ट करून या चर्चांवर पडदा टाकला. अजित पवार यांनी एका सभेला संबोधित करताना विविध विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. यावेळी केलेल्या एका विधानावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. माझा सत्कार करू नका, शाल-श्रीफळ देऊ नका, कारण आई-वडील आणि चुलत्याच्या कृपने आमचे बरे चालले आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांत निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जाहीर भाषणात आपल्या काकांची आठवण काढल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या या विधानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
काकांना आशीर्वादापुरतेच त्यांनी मर्यादित ठेवले
चांगले आहे. मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात. त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतेच त्यांनी मर्यादित ठेवले आहे, हे तुम्ही लक्षात घेत नाहीत, अशी मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांविरोधात मनसे सध्या आक्रमक झालेला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठीचा आग्रह चुकीचा नाही. तो आग्रह कुणी धरत असेल तर ते योग्यच आहे. पण त्या आग्रहाकरिता जर कायदा हातात घेतला, तर कायदेशीर कारवाई होईलच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली. आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामध्ये आपण सध्या १५०० रुपये देतो. पण ज्यावेळी आपली परिस्थिती काळानुरुप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण करू. मी ३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितले. तर त्याच्यावरुन टीका केली. जाहीरनाम्यामध्ये जरुर सांगितले होते पण माझ्या एकाही भाषणात मी सांगितले नव्हते. माझी भाषणे काढून बघा. कारण मी त्याचा उल्लेख केला की, सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही. विरोधक म्हणतात तुम्हाला घोषणा करताना आठवले नाही का. अशी टीका होणार पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे. ते नियोजन बिघडता कामा नये, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.