मुंबई - गेल्या 24 तासांपासून मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही भागात भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडून मुंबईकरांचे जीव गेले. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन घेतला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील मालाड येथे झालेल्या दुर्घटनेत भिंत कोसळल्यामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती सभागृहाच्यावतीने शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. ही घटना गंभीरच आहे. काल रात्री झालेला पाऊस हादेखील अभूतपूर्व होता असं त्यांनी सांगितले
तसेच मुंबईत साधारणपणे 4 ते 5 तासात 375 ते 400 मिमी पाऊस झाला. पावसाची गतकाळातील आकडेवारी पाहिली तर एवढ्या कमी वेळात एवढा पाऊस 1974 मध्ये पडला होता. त्यानंतर सगळ्यात जास्त पाऊस 2005 मध्ये. 40 वर्षांत कमी वेळेत इतका झालेला हा दुसराच पाऊस आहे. मुंबईतील जून महिन्याची पावसाची सरासरी यंदा केवळ 3 दिवसांत पावसाने गाठली. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईची पाणी निचरा क्षमता विचारात घेता, 24 तासात जेव्हा 150 मिमी पाऊस पडतो, तोवर ही क्षमता योग्य काम करते. मात्र अत्यंत कमी वेळात मोठा पाऊस होतो तेव्हा या व्यवस्थेवर ताण येतो. महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात भेट देऊन मुंबईची सर्व परिस्थिती जाणून घेतली. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही लावले असल्याने त्याद्वारे अनेक भागांचे लाईव्ह चित्र पाहिले. काही भागांमध्ये पावसामुळे पाणी तुंबले. ज्या भागांमध्ये पावसाचे पाणी साचण्याचा इतिहास आहे, अशा भागांमध्ये पावसाचे पाणी निचरा करण्याची व्यवस्था महापालिकेने उभी केली असल्याने पाण्याचा निचरा लवकर झाला असं त्यांनी सांगितले.
दरम्यान ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अंतर्गत मुंबईत 7 पंपिंग स्टेशन उभारायचे होते. समुद्रात उंच लाटा उसळतात तेव्हा पाऊस जोरात असेल तर पाण्याचा निचरा होत नाही. पाणी पातळी वाढून ते मोठ्या प्रमाणावर तुंबते. यावर उपाय म्हणून हे पंपिंग स्टेशन तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. समुद्राच्या जोरापेक्षा जास्त दाबाने पाणी बाहेर फेकण्यासाठी हे पंपिंग स्टेशन आहेत. या 7 पैकी 5 पंपिंग स्टेशन पूर्ण झाले आहेत. पंपिंग स्टेशनच्या उभारणीमध्ये जागा, विविध परवानग्या, सीआरझेड, न्यायालयीन प्रकरणं अशा अनेक अडचणी येतात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- मुंबईतील मिठी नदी, इतर नदी-नाले यांची जागा पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे. मिठी नदीवरील मोठ्या प्रमाणावर वसलेली अतिक्रमणं हटवली आहेत. एमएमआरडीए हद्दीतलं काम संपलं आहे. महापालिका क्षेत्रातील कामही पूर्णत्वास आले आहे. बाधितांना पर्यायी जागा दिल्या आहेत. उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.
- यंदा, सर्व परिस्थिती पाहता, किमान नाल्यांवरील बांधकामे काढण्याची मोठी मोहीम हाती घेतली होती. मात्र तिला रहिवाशांनी विरोध केला. काही लोकप्रतिनिधीही भेटले. पावसाळ्यात ही लोकं रहायला जाणार कुठे, ही बाब संवेदनेची आहे. मात्र कुठेतरी कठोर भूमिका घ्यावी लागेल.
- पूर्ण झोपडपट्टी काढली नाही तरी नाल्यांची रुंदीकरणाची गरज म्हणून तरी काही निष्कासित कराव्या लागतील. अनेक लोकप्रतिनिधींनी हे समजून सहकार्य केल्याने नाल्यांचे रुंदीकरण शक्य झाले. अद्यापही अनेक ठिकाणाहून स्थलांतरित व्हायला रहिवाशी तयार होत नाहीत.
- मोठ्या प्रमाणावर आणि काही ठिकाणी तर चार मजली बांधकामे आहेत. त्यासंदर्भात आता कठोर भूमिका घ्यावी लागेल. त्यांना हटवावे लागेल. अन्यथा त्यांच्याही जीविताला धोका आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. यासंदर्भात महापालिकेच्या बैठकीत निर्देश दिले आहेत.
- स्थलांतराची पुनर्वसनाची व्यवस्था करुनही जे हटायला तयार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेणे भाग आहे. अन्यथा सातत्याने दुर्घटना होतील. नदी-नाल्यांवर अतिक्रमणे करुन जिथे पात्र/प्रवाह बदलण्यात आले आहेत, त्याबाबतही कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेतील बैठकीत दिले आहेत.
- आता मागील 3 वर्षांचा डेटा आणि फूटेज उपलब्ध आहे. त्याआधारावर नेमका कुठे, कसा पाऊस होतो, कुठे त्याला अवरोध होतो, कुठे पाणी तुंबते, याचा अभ्यास करुन पुढची कार्यवाही करणार आहोत. त्याचेही निर्देश दिले आहेत.
- नालेसफाईचे वेळापत्रक निश्चित करुन वेळेच्या आत नालेसफाई झाली पाहिजे. नालेसफाईचे धोरण महापालिकेने तयार करुन घोषित करावे, यासंदर्भात कार्यवाही केली जाईल.
- रात्रभरामध्ये मुंबई पोलिसांना 1700 ट्वीट आले. प्रत्येक ठिकाणी पोलिस विभाग पोहोचला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही हजारापेक्षा जास्त कॉल आले. त्या प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी पोहोचले. रात्रभर महापालिकेचे डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कार्यरत होते. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
- अशा घटना घडू नये म्हणून हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होईपर्यंत बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य काळजी सर्वांना घ्यावी लागेल. त्याबाबतचेही निर्देश दिले आहेत. सभागृहाच्या भावनांना अनुरुप कार्यवाही शासन करेल, बेघरांना योग्य मदत मिळेल, याचे आश्वासन देतो.