२ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा; ‘या’ प्रकल्पांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 06:18 IST2025-03-05T06:17:37+5:302025-03-05T06:18:40+5:30

हाजीअली येथे १२०० क्षमतेचे वाहनतळ; नालेसफाईच्या कामात ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देश

cm devendra fadnavis reviews projects worth 2 lakh crore for mumbai | २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा; ‘या’ प्रकल्पांचा समावेश

२ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा; ‘या’ प्रकल्पांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे दोन लाख कोटींच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी नालेसफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विधान भवनात झालेल्या या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे सुद्धा उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे सुमारे एक लाख ४१ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. 

यामध्ये सुमारे ७०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे, वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, बेलासिस पूल, महालक्ष्मी पूल, मढ-वर्सोवा पूल यांची कामे, दहिसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जीविकरण आणि मिठी नदी स्वच्छता प्रकल्प, यांसह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवा, मालाड, भांडूप, घाटकोपर येथील मलजल उदंचन केंद्र, वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज, मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलनिस्सारण प्रकल्पांचाही समावेश आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या वतीने सायन, केईएम आणि नायर रुग्णालयांचा पुनर्विकास तसेच नवीन रुग्णालयांची उभारणी, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर जकात नाका आणि मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. 

या प्रकल्पांचा समावेश

निक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज ५, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण आणि मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

हाजीअलीला १२०० क्षमतेचे वाहनतळ उभारा

छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या मार्गाच्या परिसरात हाजीअली येथे १२०० वाहन क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावण्याचे आणि  प्रस्तावित प्रकल्पांसाठीच्या निविदांची कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा आहे. तो सुरू करण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया आणि इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

Web Title: cm devendra fadnavis reviews projects worth 2 lakh crore for mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.