संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा आवश्यक होता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 06:32 IST2025-03-06T06:28:14+5:302025-03-06T06:32:06+5:30
धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की चुकीच्या वेळी झाला? इतका विलंब का झाला? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा आवश्यक होता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली आहे आणि या गुन्ह्यात ज्याला मास्टरमाइंड ठरवण्यात आले आहे, तो मंत्र्याच्या इतका जवळचा आहे, तर मग मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे, हे आपले मत होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की चुकीच्या वेळी झाला? या वादात मी जाणार नाही. राजकारणात तुम्ही पहिल्या दिवशी घ्या, दुसऱ्या दिवशी घ्या किंवा शेवटच्या दिवशीही घेतला, तरी लोक बोलतातच. मुंडे यांच्या राजीनाम्याला विलंब का झाला, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, महायुतीचे राजकारण, कधी कधी निर्णयाला वेळही लागतो. पण, आम्ही ठामपणे भूमिका घेतली आणि त्यांनी राजीनामा दिला.