“‘छावा’ पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित, औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतोय”: CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:27 IST2025-03-18T15:25:12+5:302025-03-18T15:27:50+5:30

CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha: महाराष्ट्रात ‘छावा’ या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

cm devendra fadnavis said in vidhan sabha that people emotions are ignited by watching chhaava cinema and anger towards aurangzeb is coming out | “‘छावा’ पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित, औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतोय”: CM देवेंद्र फडणवीस

“‘छावा’ पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित, औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतोय”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha: औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी छावा चित्रपटाला उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

निवेदन सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला कुठल्या चित्रपटावर टीका करायची नाही. आज महाराष्ट्रात ‘छावा’ या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावनाही मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा राग मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहे. पण हे सगळे जरी असले, तरी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

सर्वांनी संयम बाळगला पाहिजे

सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. येथील सामाजिक घडी व्यवस्थित राहिली, तर आपण ज्या प्रगतीच्या दिशेने निघालो आहोत. त्या दिशेने जाण्यास आपल्याला मदत होईल. पण ठामपणे सांगतो की, कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा जात-धर्म न पाहता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच  ११ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचे समोर येत आहे. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली. वाहनांची जाळपोळ झाली. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. एक नक्की सांगतो की, पोलिसांवर ज्यांनी कुणी हल्ला केला असेल, त्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही. पोलिसांवर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला करणे चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

Web Title: cm devendra fadnavis said in vidhan sabha that people emotions are ignited by watching chhaava cinema and anger towards aurangzeb is coming out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.