Join us

FDIमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, ६ महिन्यांत किती गुंतवणूक झाली? CM फडणवीसांनी आकडेवरीच दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:20 IST

CM Devendra Fadnavis News: एफडीआयमध्ये कर्नाटक आणि गुजरातला धोबीपछाड देत महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य ठरल्याचे आकडेवारीत सांगितले गेले आहे.

CM Devendra Fadnavis News: एकीकडे बीड आणि परभणी प्रकरणावरून महाविकास आघाडीसह विरोधक महायुतीवर हल्लाबोल करत असून, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावरून महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक मुद्दे गाजत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राहिला असून, गेल्या सहा महिन्यात किती गुंतवणूक आली, याबाबत आकडेवारी दिली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी आकडेवारी दिली आहे. आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के एफडीआय अवघ्या ६ महिन्यात...  पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील

आता २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली तर १,१९,५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो... माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. 

२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी२०२४-२५ (एप्रिल ते सप्टेंबर या ६ महिन्यात) : १,१३,२३६ कोटी

दरम्यान, या पोस्टसोबत जोडलेल्या एका आकडेवारीनुसार थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्क्यांसह महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. तर कर्नाटक दुसऱ्या (२१ टक्के), गुजरात तिसऱ्या (१८ टक्के), दिल्ली चौथ्या (१३ टक्के), तामिळनाडू पाचव्या (५ टक्के), हरयाणा सहाव्या (४ टक्के), तेलंगण सातव्या (४ टक्के), झारखंड आठव्या (१ टक्का), राजस्थान नवव्या (१ टक्का) आणि पश्चिम बंगाल दहाव्या (१ टक्का) स्थानी आहेत.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसपरकीय गुंतवणूकमहाराष्ट्रमहायुतीराज्य सरकार