मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी रात्री अचानक अहमदाबादला रवाना झाले. तेथे त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मंत्रिमडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.मंत्रिमंडळ विस्तारास शहा यांनी हिरवा झेंडा दाखविल्याचे समजते. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी २८ नोव्हेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री सातत्याने सांगत आहेत. मात्र या भेटीत तारीख निश्चित होऊ शकली नाही, अशी माहिती मिळाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशास शहा हे अनुकूल आहेत. नारायण राणे यांनी सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असेही सूत्रांनी सांगितले.मंत्रिमंडळ विस्तारात काहींना डच्चू दिला जाऊ शकतो. दोन कॅबिनेट मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असेही समजते. मुख्यमंत्र्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा शहा यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री हे गुजरातमध्ये प्रचारालाही जाणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांची शहांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 4:58 AM