Join us

पंढरपूर, अक्कलकोटचा विकास आराखडा मंजूर; ४४१ कोटींचा निधी देणार; यात्रा अनुदान केले दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 7:32 PM

Eknath Shinde: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले.

Eknath Shinde: महाराष्ट्रात अनेक देवस्थाने प्रसिद्ध आहेत. त्यातच पंढरपूर आणि अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात. यातच आता आषाढी वारी सुरू होणार आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट येथील विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून, यासाठी ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. 

राज्य शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ट्विटवर माहिती शेअर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

यात्रा अनुदान ५ कोटींवरुन १० कोटी रुपये करण्याची घोषणा

राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करावा, असे निर्देश देताना यात्रा अनुदान ५ कोटींवरुन १० कोटी रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

दरम्यान, मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक झाली. खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, सुभाष देशमुख, समाधान अवताडे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, रणजीत सिंह मोहिते पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसपंढरपूरअक्कलकोट