Join us

"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 1:46 PM

भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

11 Crores Prize Announced to Team India : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावलं. जगज्जेत्या संघावर गेल्या काही दिवसांपासून पूर्ण भारतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मात्र आता सरकारी तिजोरीतून एवढं मोठं बक्षीस जाहीर केल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाला कोट्यवधि रुपये दिलेले असताना पुन्हा ११ कोटी देण्याची काय गरज? असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याआधी भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. त्यानंतर विधीमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघाला राज्य सरकारकडून ११ कोटींचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र आता यावरुन राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षांनी टीका केली आहे.

चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांची घोषणा - विजय वडेट्टीवार 

"भारतीय संघाने विश्वचषक जिंकला याचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यांना कोट्यवधीची बक्षीसे जाहीर झाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा विश्वचषक जिंकतो, तेव्हा ते स्वतःच्या बॅगा उचलून घरी जातात पण भारतात तशी परिस्थिती नाही. भारतातील चाहते क्रिकेटपटूंना डोक्यावर घेतात. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आपण पाहिलं की लाखोंच्या संख्येने चाहते रस्त्यावर उतरले होते. चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असावी," अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची काही गरज नव्हती. मुंबईकर चार खेळाडूंना एक-एक कोटी देण्याची घोषणा झाली होतीच. मग इतर खेळाडूंना बक्षीस देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. क्रिकेटपटूंना आधीच खूप पैसे मिळाले आहेत. क्रिकेटपटू पैशांसाठी नाही तर देशासाठी खेळतात, मग त्यांना पैसे का देत आहात? शेतकऱ्यांना जर मदत मिळत नसेल तर सरकारचा पर्दाफाश जनता करेल. क्रिकेट खेळाडूंना बीसीसीआयने १२५ कोटी दिले आहेत, तरीही सरकारी तिजोरीतून पैसे देण्याची गरज नव्हती. मात्र स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी हे बक्षीस दिले गेले. गरीब मेला तरी चालेल पण सरकारला थाप मिळाली पाहीजे असा राज्यकर्त्यांचा उद्देष आहे," असेही विजय वडेट्टीवार म्हणाले 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघएकनाथ शिंदेबीसीसीआयविजय वडेट्टीवार